सिगारेट न दिल्याने टोळक्याची मारहाण

crime diary

सिगारेट देण्यास नकार दिल्याने टोळक्याने एकास शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याची घटना विजय ममता थिएटरजवळ, नाशिकरोड येथे घडली. याप्रकरणी रवी अशोक शिंदे उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी टाकळी येथील सुग्या उर्फ सुगंध निर्मल, दादू संसारे, विनोद राजू वाकळे यांना अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रवी शिंदे यांचा भाऊ प्रशांत हे पाणटपरीवर आले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ आले. त्यांनी त्यांच्याकडे सिगारेट मागितली. त्यावेळी प्रशांत यांनी सिगारेट देण्यास नकार दिल्या. राग अनावर झाल्याने संशयितांनी संगतमताने प्रशांत यांना शिवीगाळ व मारहाण केली. तू येथे टपरी कशी चालवतो, रात्रीतून तुझी टपरी फोडतो, अशी धमकी संशयितांनी प्रशांत यांना दिली. पुढील तपास पोलीस हवालदार शेजवळ करत आहेत.

किरकोळ कारणातून एकाला मारहाण

किरकोळ कारणातून कामगाराने एकाला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घास बाजार, भद्रकाली येथे घडली. याप्रकरणी विकी संजय इंगळे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित रहीम चिकनवाला दुकानातील कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विकी इंगळे दुकानासमोरील ड्रममधून पाणी घेत होते. त्यावेळी संशयिताने तू ड्रममधून पाणी का काढतो, असे म्हणत वाद घातला. त्यानंतर संशयिताने शिवीगाळ करत विकीस मारहाण केली. पुढील तपास पोलीस नाईक सूर्यवंशी करत आहेत.

मासे खरेदी करणे पडले महागात; दुचाकी गायब

दुचाकीमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना मच्छी मार्केट, भद्रकाली येथे घडली. याप्रकरणी श्रीराम गोविंद राठोड यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीराम राठोड मासे खरेदी करण्यासाठी मच्छी मार्केटमध्ये दुचाकीवरुन आले. मार्केट परिसरात त्यांनी दुचाकी पार्क केली. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केली. ते पार्किंग ठिकाणी आले असता दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस हवालदार भोईर करत आहेत.

जॉगिंग ट्रॅक परिसरातून दुचाकी लंपास

दुचाकीमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, स्पार्क फर्निचर दुकानासमोर घडली. याप्रकरणी दीपक भागवत यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक भागवत यानी दुचाकी स्पार्क फर्निचर दुकानासमोर पार्क केली होती. यांच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केली. ते पार्किंग ठिकाणी आले असता दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस हवालदार गाढवे करत आहेत.

जुन्या भांडणातून टोळक्याची मारहाण

जुन्या भांडणातून टोळक्याने एकास शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना म्हाडा कॉलनी, वडाळागाव, इंदिरानगर येथे घडली. याप्रकरणी दीपक राजू पाटील यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी म्हाडा कॉलनी, वडाळागाव येथील संशयित दादासाहेब नेटारे, आकाश नेटारे, कैलास नेटारे, चिंतामण त्र्यंबक नेटारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयित दादासाहेब नेटारे यांनी स्टंपने दीपक पाटील यांना मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी पाटील यांना शिवीगाळ व मारहाण केली. पुढील तपास पोलीस हवालदार निकम करत आहेत.