घरमहाराष्ट्रनाशिककौमार्य चाचणीच्या दहशतीने तरुणी करत आहेत कौमार्य शस्त्रक्रिया!

कौमार्य चाचणीच्या दहशतीने तरुणी करत आहेत कौमार्य शस्त्रक्रिया!

Subscribe

काही तरुणी तथाकथीत कौमार्याच्या संकल्पनेत स्वत:ला बसविण्यासाठी शस्त्रक्रीया करीत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

कौमार्य चाचणीच्या विरोधात राज्यभर संताप व्यक्त होत असताना आता काही तरुणी तथाकथित कौमार्याच्या संकल्पनेत स्वत:ला बसविण्यासाठी शस्त्रक्रिया करीत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. लग्नाच्या सीझनमध्ये अशा शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती जात पंचायत मूठ माती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

कंजारभाट समाजात लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीची कौमार्य चाचणी करण्याची कुप्रथा अजूनही सुरू असल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. या कुप्रथेतून महिलांचं शोषण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पहिल्या रात्री तरुण-तरुणीच्या शरीरसंबंधांमध्ये पांढर्‍या कपड्यावर रक्ताचा डाग न पडल्यास तरुणी या चाचणीमध्ये ’नापास’ ठरते. तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिला पंचांसमोर कपडे उतरवणं, शरीराच्या नाजूक भागांना चटके देणं, उकळत्या तेलातून नाणे बाहेर काढायला लावणं असे अनेक प्रकारचे अमानवीय दंड दिले जातात. ही बाब टाळण्यासाठी तरुणींनी कौमार्याच्या चुकीच्या संकल्पनेला खतपाणी घालणे सुरु केले आहे. त्यासाठी योनीमार्गातील फाटलेला पापुद्रा शस्त्रक्रीयेव्दारे जोडला जात आहे. मुंबई आणि पुण्यात अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. प्रसिद्ध कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जन डॉ. पराग सहस्त्रबुद्धे यांनी तरुणींचा कौमार्य शस्त्रक्रियेकडे कल वाढला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

चळवळ उभी कशी राहणार?

खरतर स्त्रीचं ’योनीपटल’ हा अत्यंत नाजूक भाग असतो. लग्नानंतर केवळ शारीरिक संबंधांनंतरच नव्हे, तर आजच्या धकाधकीच्या जीवनात सायकलिंग, खेळ किंवा व्यायामानेदेखील आतला पापुद्रा फाटू शकतो हे वैद्यकीय तज्ञांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. तरीही मुली जात पंचायतींच्या भीतीने योनीमार्गाचे ऑपरेशन करत असल्याच्या तक्रारी आमच्याकडेही प्राप्त झाल्या आहेत. तरुणींनीच या बाबीला खतपाणी घातल्यास त्या विरोधातील चळवळ उभी कशी राहणार?

कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जात पंचायत मूठ माती समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -