घरमहाराष्ट्रनाशिकद्राक्ष निर्यातीने गाठला १ लाख टनाचा पल्ला

द्राक्ष निर्यातीने गाठला १ लाख टनाचा पल्ला

Subscribe

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत २० टक्क्यांनी वाढ झाली. गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून ८८ हजार २०२ टन द्राक्षे युरोपीय बाजारपेठेत निर्यात झाली होती.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत २० टक्क्यांनी वाढ झाली. गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून ८८ हजार २०२ टन द्राक्षे युरोपीय बाजारपेठेत निर्यात झाली होती. यंदा त्यात वाढ होऊन आतापर्यंत तब्बल १ लाख १२ हजार ४१६ टन द्राक्ष निर्यात झाली आहे. पाणीटंचाई, दीर्घ काळ रेंगाळलेली थंडी याचा परिणाम होऊन यंदा द्राक्षांची आवक वाढली. त्यात यंदा गारपिटीसारखी मोठी आपत्ती न असल्याने द्राक्षपीक नुकसानीपासून वाचले. मात्र, या स्थितीत देशांतर्गत तसेच युरोपच्या बाजारपेठेत आवक जास्त असल्याने द्राक्ष बाजारात मंदीचेच वातावरण राहिले.

द्राक्ष निर्यात हंगाम डिसेंबरपासून सुरू राहिला. रशिया, श्रीलंका या बाजारात फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रावरून काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या. त्या शिवाय युरोपसह जगातील इतरही देशांत भारतीय द्राक्षांना मागणी राहिली. भारतातून ८३१७ कंटेनरमधून निर्यात झाली. त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे ४८०८ कंटेनर निर्यात नेदरलॅन्ंड मध्ये झाली. त्या खालोखाल युरोपातील आघाडीवर असलेले जर्मनीत १४३३, इंग्लंड मध्ये १३१७, डेन्मार्क मध्ये १७३ व फिनलँड मध्ये १२४ कंटेनर निर्यात झाली. युरोपीय बाजारपेठेत भारतीय द्राक्षांची स्पर्धा दक्षिण अफ्रिका व चिली या मातब्बर देशांशी होते. यंदा त्यात पहिल्यांदाच पेरूची भर पडली. फेब्रुवारीपर्यंत एकट्या पेरूमधून युरोपात १५ हजार टनांची द्राक्ष निर्यात झाली. त्या शिवाय भारतातून दर आठवड्याला होणार्‍या कंटेनरच्या संख्येत २० ते २५ टक्क्यांनी वाढ होत होती. या स्थितीत निर्यातक्षम द्राक्षांच्या दरातही यंदा ३ ते ४ युरोंनी घट झाली. त्याचा परिणाम यंदा भारतातील निर्यातक्षम द्राक्षांच्या दरावर झाला. भारतातील निर्यातक्षम द्राक्षांच्या दरात यंदा ३० ते ४० टक्क्यांनी घसरण झाली होती. अर्थात निर्यात वाढूनही त्याचा
द्राक्ष उत्पादकांना अपेक्षित दराचा लाभ मिळालाच नाही.

- Advertisement -

दर वाढल्याने मागणी स्थिर

द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, जवळपास ८० टक्के हंगाम आटोपला आहे. मागील सप्ताहाच्या तुलनेत द्राक्षांच्या दरात ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, दर वाढल्यामुळे परराज्यातून मागणी स्थिर आहे. द्राक्षांना प्रतिकिलोला ३५ ते ४५ व सरासरी ४० रुपये दर मिळत आहे. येत्या सप्ताहात हा दर टिकून राहील, अशी स्थिती आहे. – राजेंद्र पवार, अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -