घरमहाराष्ट्रनाशिकवारसा फेरीतून उलगडला गोदावरीतील प्राचीन कुंडांचा इतिहास

वारसा फेरीतून उलगडला गोदावरीतील प्राचीन कुंडांचा इतिहास

Subscribe

गोदावरी नदी महोत्सवाला विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुरूवात, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांचा सहभाग

गोदावरी नदीच्या विकासासाठी बुधवार(दि.१५)पासून गोदावरी नदी महोत्सवाला गोदाकाठावर देवमामलेदार महाराज मंदिरासमोरून वारसा फेरीच्या माध्यमातून सुरुवात झाली. प्राचीन कुंडांचे अभ्यासक देवांग जानी यांनी गोदावरीच्या काठावरील प्राचीन कुंड आणि त्यांचा इतिहास उपस्थित नाशिककरांना सांगितला. गोदावरी काठावरील कुंडांची माहिती देताना त्यांनी नकाशाच्या माध्यमातून सादरीकरण केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी नाशिक, राज्य पुरातत्त्व विभाग व नाशिक इतिहास संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी नदी महोत्सव १५ ते २१ डिसेंबरदरम्यान साजरा केला जात आहे. गोदावरी उत्सव व वारसा फेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मयुरा मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पुरातत्त्व विभागाच्या उपसंचालिका आरती आळे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवानिमित्त पूजा नीलेश यांचा सुलेखन प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. तर चित्रकार रमेश जाधव यांनी गोदावरी व नदी संदर्भातील चित्रांचे सादरीकरण केले. त्यास नाशिककरांनी प्रतिसाद दिला.

- Advertisement -

यावेळी अभ्यासक रमेश पडवळ यांनी अश्मयुगीन इतिहास, नदीचे महत्त्व, नदी संस्कृत आणि नदीभोवतीच्या वारसास्थळांची माहिती दिली. प्रा. सुरेखा बोर्‍हाडे यांनी गोदावरी नदी याविषयी एकपात्री नाटक सादर केले. गजानन महाराज गुप्ते मंदिरात चित्रकार रमेश जाधव यांनी गोदावरी या विषयावर साकारलेली दीडशेहून अधिक चित्रांच्या प्रदर्शनाला जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वातंत्र्यसैनिकांवर काढलेल्या चित्रांचे पुस्तक जिल्हा प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची सांगितले.

यावेळी नाशिक इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष योगेश कासार-पाटील, आनंद बोरा, डॉ. अजय कापडणीस, महेश शिरसाट उपस्थित होते. पंचवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सरकारवाडा पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

अशी झाली वारसा फेरी

गजानन महाराज गुप्ते मंदिरात झालेल्या कार्यक्रमानंतर वारसा फेरीला बुधवारी सकाळी सुरूवात झाली. सकाळी ८.३० ते १०.३० या दोन तासांच्या वारसा फेरीत जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त सहभागी झाले होते. देवमामलेदार मंदिर, दुतोंड्या मारूती, अहिल्याराम मंदिर, कुष्ण मंदिर व नारोशंकर मंदिर अशी वारसा फेरी पार पडली. यादरम्यान नाशिकचा इतिहास व शक्ती, भक्तीस्थळांची माहिती करून देण्यात आली.

गोदावरी नदी व त्याकाठची वारसास्थळे नाशिकची मोलाची संपत्ती आहे. ती जपण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. वारसा जपत विकास करणे गरजेचे आहे. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

गोदावरी नदीविषयी असलेल्या विशेष प्रेमामुळे नाशिकशी नाते अधिक घट्ट झाले आहे. गोदावरी नदीबद्दल सर्वांच्या मनात आदरभाव निर्माण झाला पाहिजे. – दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त

गोदावरी नदीतील अतिक्रमणांमुळे गोदावरी नदीचा नैसर्गिक प्रवाह नष्ट होत आहेत. गोदापात्रात कोणत्याही स्वरूपाचे अतिक्रमण होता नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यायला हवा. नदी पात्रातील प्राचीन कुंड वाचली तर नदीचा नैसर्गिक प्रवाह सुरक्षित राहील. त्यामुळे सर्व कुंड पुन्हा निर्माण करता येतील का, याचा अभ्यास व्हायला हवा. – देवांग जानी, कुंड अभ्यासक

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -