रस्त्यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण

कायदेशीर कारवाई करून वहिवाटासाठी नियमानुसार रस्ता मोकळा करून देण्याची मागणी

Hunger strike

कन्नड तालुक्यातील मौजे तपोवन येथील शेतकरी ज्ञानेश्वर सोनवणे व इतर पीडित शेतकर्‍यांनी मौजे तपोवन शिवारातील गट नं. 85 मधील अडविलेला पोट रस्ता मोकळा करून सुद्धा पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता आडविणार्‍यावर कायदेशीर कारवाई करून वहिवाटासाठी नियमानुसार रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पीडित शेतकर्‍यांना शेतीजमिनीत जाण्याच्या पारंपारिक वहिवाटीचा शासकीय मालकीचा सर्वजनिक वापराचा पाठ रस्ता गट नं. 85 चे शेतकरी पुंजाबा कोडीबा सोनवणे व त्यांच्या कुटुंबीयांनी यांनी बेकायदेशीर अडविल्या बाबत रस्ता मोकळा करून देणेबाबत तहसीलदार कन्नड न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाचे निकालान्वेये गुरुवार (दि. 17) रोजी शासकीय कारवाईत व पोलीस बंदोबस्तात रस्ता मोकळा करून दिला. मात्र तेथून पोलीस व पाटबंधारे विभागाचे कर्मचारी यांची पाठ फिरताच रस्ता अडवणार्‍या पुंजाबा कोंडिबा सोनवणे व त्यांच्या कुटुंबीयांनी या सार्वजनिक वापराचा शासकीय मालकीच्या पाट रस्तावर पुन्हा अतिक्रमण करून रस्त्यावर काट्या टाकून रस्त्यावर मका पेरला व पुन्हा पिडीत शेतकर्‍यांच्या वहिवाटीस अडथळा आणला. ही बाब तात्काळ सिंचन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या नजरेस आणून दिली.

मात्र सिंचन विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे कारवाई करण्यास टाळाटाळ करत असून वरील अतिक्रमण बेकायदेशीर संरक्षण देत आहे. रस्त्याअभावी शेतजमिनीत जाण्यासाठी शेतकर्‍यांना आडवत आहे. नियमानुसार रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीसाठी तपोवन येथील ज्ञानेश्वर सोनवणे यांच्यासह इतर शेतकर्‍यांनी उपोषण सुरू केले आहे.