घरक्राइमडॉ. वाजे मृत्यूचे गूढ कायम : फॉरेन्सिक लॅबकडून डीएनए नमुन्यांचे विश्लेषण सुरू

डॉ. वाजे मृत्यूचे गूढ कायम : फॉरेन्सिक लॅबकडून डीएनए नमुन्यांचे विश्लेषण सुरू

Subscribe

आरटीओकडून कार जळण्यामागचा अहवाल पोलिसांना सादर

नाशिक : वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यूचे गूढ सहा दिवस उलटूनही कायम आहे. प्रादेशिक न्यायवैधक प्रयोगशाळेतील डीएनए विभागाकडून मिळलेल्या नमुन्यांनुसार तपास केला जात आहे. डीएनए अहवालातून मृत व्यक्ती कोण आहे ते समजणार असून, त्यानंतर पोलिसांना तपासाला दिशा मिळणार आहे. या अहवालाकडे पोलिसांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. शिवाय, आरटीओकडून कार कशी जळली, याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.

नाशिक महापालिकेच्या मोरवाडीतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा संदीप वाजे (३८, रा. कर्मयोगी नगर, गोविंद नगरजवळ, नाशिक) या बेपत्ता झाल्याने पतीने अंबड पोलिसांत त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मात्र, त्याच दिवशी वाडीवर्‍हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगडनगरजवळ रस्त्याच्या कडेला कारमध्ये जळालेल्या अवस्थेत महिलेचा सांगाडा आढळला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली.

- Advertisement -

अंबड पोलिसांनी मिसिंगच्या तक्रारीनुसार डॉ. वाजे यांचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाआधारे शोध सुरु केला आहे. तर नाशिक ग्रामीण पोलीस विल्होळीनजीक घटना घडल्याने या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत. शिवाय, फॉरेन्सिक लॅबकडून डीएनएसह मिळालेल्या नमुन्यानुसार तपासणी केली जात आहे.
घटनास्थळी मिळून आलेली मानवी हाडे डॉ. वाजे यांचीच आहे की आणखी कोणाची आहेत, हे फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट होणार आहे.

फॉरेन्सिक लॅबने घेतलेले नमुने

जळालेला सांगाडा महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, बेपत्ता महिला डॉ. वाजे आहेत का याची शहानिशा करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमधील डीएनए विभागात चाचणी करण्यासाठी पथकाने २८ जानेवारी रोजी मृत महिलेच्या हाडांच्या नमुन्यांसह कुटुंबियांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत. डीएनए पृथकरण करुन विश्लेषण केले जात आहे. त्यास पाच दिवस लागणार आहेत. त्यात काही त्रुटी आढळून आल्यास पुन्हा नव्याने नमुने घेतले जाणार आहेत.

डॉ. वाजे या बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनुसार तांत्रिक तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजसह त्या दिवसभर कुणाच्या संपर्कात होत्या का, याचा शोध घेतला जात आहे.
– भगीरथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -