घरमहाराष्ट्रनाशिकनगरमध्ये फक्त ‘विखे फॅक्टर’

नगरमध्ये फक्त ‘विखे फॅक्टर’

Subscribe

राज्यात हेवीवेट ठरलेल्या सुजय विरूध्द संग्राम लढतीत ‘विखे- पाटील पॉवर’ ने आपली ताकद दाखवून नगरमध्ये फक्त विखेंचे नाणं चालणार असल्याचे सिध्द केले आहे.

तुषार माघाडे, नाशिक

राज्यात हेवीवेट ठरलेल्या सुजय विरूध्द संग्राम लढतीत ‘विखे- पाटील पॉवर’ ने आपली ताकद दाखवून नगरमध्ये फक्त विखेंचे नाणं चालणार असल्याचे सिध्द केले आहे. नगरची निवडणूक पक्षीय अजेंडापेक्षा विखेविरूध्द राष्ट्रवादी अशीच रंगली. नवरा मेला तरी चालेल, पण सवत विधवा झाली पहिजे, या म्हणीनुसार हक्काच्या जागा एकमेंकाच्या जिरवाजीरवीत कशा हातच्या जातात, हे आघाडीने सगळ्या राज्याला दाखवून दिले आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात कार्यकर्ता, तीनवर्षापासून मतदारसंघात केलेली ‘नांगरणी’, विखे-पाटील नावाच वलय, या सुजय विखेंसाठी जमेच्या बाजू ठरल्या. तर संग्राम जगताप यांचे नगर शहर वगळता कमजोर नेटवर्क ही त्यांची उणीव ठरली. केवळ घड्याळ चिन्हावर भरोसा ठेवून त्यांनी ही निवडणूक लढवली. सासर्‍यांचा बालेकिल्ला असलेल्या राहुरी तालुक्यातही जगतापांना मतधिक्क मिळू शकले नाही. सर्वधिक मतदान हे राहुरीमध्ये झाले होते. येथे विखेंच्या पारड्यात भरघोस मताचे दान पडले.

सुजय विखेंच्या उमेदवारीवरून सगळ्या राज्याला महिनाभर ‘पॉलिटिकल इंटरटेनमेंट’ बघायला मिळाले. प्रचंड घडामोडी, राजकारणाचे ना-ना रंग, हाय व्हॉल्टेज ड्रामा, विविध पैलू दिसून आले. विखे-पवार जुना वाद चर्चेला आला. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुजय विखे यांना तिकीट सोडण्याची राष्ट्रवादीकडे मागणी केली होती. राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिला; यामुळे विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शाब्दिक चकमकही उडाली होती. यानंतर विखेविरूध्द -राष्ट्रवादी लढतीचे रंग भरत गेले. विरोधी पक्षनेत्याचा मुलगा भाजपमध्ये जावून उमेदवारी मिळवतो. यावरून काँग्रेसला नाचक्की सहन करावी लागली. ज्या दिवशी सुजय विखेंचा भाजप प्रवेश झाला, तेव्हापासून राधाकृष्ण विखे-पाटील मनाने काँग्रेसपासून दुर झाले होते. यावेळेसच नगरमध्ये चित्र काय असणार, याचे बर्‍यापैकी चित्र स्पष्ट झाले होते. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी नगर काँग्रेसची कमान सांभाळली. मात्र, काँग्रेसमधील गटबाजी, असंवादामुळे त्यांची काही मात्रा चालली नाही. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विरोधीपक्ष नेतेपदाच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस आणखी कुमकवत झाली. जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीची नामुश्की काँग्रेसवर ओढवली. निवडणूक काळात राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुजयचा उघड प्रचार केल्याचा आरोपही करण्यात आला होता. भाजपने पक्षप्रवेशावेळीच खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कापत उमदेवारीची माळ सुजय यांच्या गळ्यात घातली. यांनतर नाराज गांधी गटाचे उपद्रव्य मुल्य रोखण्यास भाजप- विखे बर्‍यापैकी यशस्वी झाले.

- Advertisement -

दक्षिणेवर उत्तरेचा प्रभाव

निवडणुकी दरम्यान, नगर दक्षिणेत नेता दक्षिणेचाच हवा, हा मुद्दा जास्त प्रचारात वापरला गेला. दक्षिणेत उत्तरेचे राज्य नको, यासाठी रान उठवले गेले. परंतु, सुजय विखेंच्या विजयामुळे दक्षिणेने उत्तरेच्या नेत्यावर विश्वास टाकून विजयाचे दान पारड्यात टाकले आहे. पुन्हा एखादा दक्षिणेवर उत्तर नगरचा प्रभाव दिसून आला.

ऐनवेळीच्या उमेदवारीने लढत ढिली

ऐनवेळी राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांना दिलेली उमेदवारी, नगर शहर वगळता कमजोर कार्यकर्ता नेटवर्कमुळे जगताप प्रभावी ठरले नाही. दुसरीकडे विखेंनी मतदारसंघात तीन वर्षापासून केलेली तयारी, मतदारसंघाची ‘पूर्व मशागत’ विविध शिबिर, उपक्रमांच्या माध्यमातून नागिरकांशी जोडलेली नाळ, प्रत्येक गावात निष्ठावान कार्यकर्ता या गोष्टी विखेंना विजयाच्या समीप घेऊन गेल्या. खासकरून विखेविरूध्द- राष्ट्रवादी अशीच लढत रंगली. यात विखे भारी ठरले.

सर्वाधिक मतदान राहुरीमधून

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ५४ हजार २४८ मतदार असून सरासरी ६४.२६ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान राहुरी मतदारसंघात झाले तर सर्वात कमी मतदान अहमदनगर शहर मतदारसंघात झाले. शेवगावमध्ये ६३. ४० टक्के, राहुरी ६६. ७७ टक्के, पारनेर ६६. १० टक्के, अहमदनगर शहर ६०. २५ टक्के, श्रीगोंदा ६४. ७५ तर कर्जत-जामखेडमध्ये ६४. १० टक्के मतदान झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -