घरमहाराष्ट्रनाशिकथकबाकीदार शेतकर्‍यांच्या जमीन लिलावाकडे पाठ

थकबाकीदार शेतकर्‍यांच्या जमीन लिलावाकडे पाठ

Subscribe

जिल्हा बँकेचे थकीत कर्ज वसुलीसाठी येथील शेतकरी खंडेराव थेटे यांच्या शेतजमिनीचा लिलाव गिरणारे येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, शेतकरी संघटना व शेतकर्‍यांनी या लिलाव प्रक्रियेला विरोध केल्यामुळे निर्धारित वेळेत बोली लावणासाठी कुणीही पुढे आले नाही.

जिल्हा बँकेचे थकीत कर्ज वसुलीसाठी येथील शेतकरी खंडेराव थेटे यांच्या शेतजमिनीचा लिलाव गिरणारे येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, शेतकरी संघटना व शेतकर्‍यांनी या लिलाव प्रक्रियेला विरोध केल्यामुळे निर्धारित वेळेत बोली लावणासाठी कुणीही पुढे आले नाही. यामुळे जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

नाशिक तालुक्यातील गिरणारे गावातील वाडगाव सहकारी सोसायटीच्या कार्यालयात गुरुवारी (दि.३०) कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या जमिनीचा लिलाव होता. यावेळी जिल्हा बँकेचा २२ ते २५ अधिकारी कर्मचार्‍यांचा ताफा लिलाव प्रक्रियेस उपस्थित होता. येथे नाशिक तालुका पोलीस ठाण्याने चोख बंदोबस्तही ठेवला होता. याच निमित्ताने शेतकरी संघटनेचे जिल्ह्यातील जेष्ठ पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत गिरणारे येथे गाव चौफुलीवर ‘शेतकरी संघटना (शरद जोशी प्रणित) कर्जवसुली अधिकार्‍यांना गावबंदी’ असा फलक लावण्यात आला. या फलकांचे अनावरण शेतकरी संघटनेचे जिल्हा नेते रामनाथ ढिकले यांचे हस्ते झाले. यावेळी संघटनेचे जिल्हा प्रवक्ता भगवान बोराडे, प्रसिद्धीप्रमुख गोकूळ पाटील, कर्जबाजारी शेतकरी खंडेराव पाटील कातड, तालुकाध्यक्ष मधुकर हांबरे, इगतपुरी तालुकाप्रमुख तानाजीराव झाडे, महिला अध्यक्षा यमुनाबाई हांबरे, संपत थेटे, शामराव कसबे, बाळू पाटील, मदन पाटील, परशराम खोसकर, कचरू पाटील, गोकूळ पाटील, मयूर पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisement -

फलकांचे अनावरण झाल्यावर शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी थेट गावात शेत जमीन लिलावाचे ठिकाण गाठून अधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी अधिकारी व संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या चर्चेत दोन्ही बाजूनी शाब्दिक चकमक झाली. दुपारी ३ पर्यंत एकही व्यक्ती या शेती लिलावप्रक्रियेस बोली लावण्यास आला नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांना यश आले, असे संघटनेचे नेते रामनाथ ढिकले यांनी सांगितले.

शेतकरी संघटनेचा विरोध

जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांनी कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या जमिनीच्या लिलाव प्रक्रियेला शेतकरी संघटनेतर्फे विरोध करण्यात आला. आधी जिल्हा बैंकेला बुडवणार्‍या व कोट्यवधींचे कर्ज बेकायदा लाटणार्‍यांचे लिलाव करा. त्यांना मोकळे सोडून शेतकर्‍यांचा लिलाव करू नका, शेतकरी कर्जबुडवे नाहीत, अशा शब्दात शेतकरी संघटनेने जिल्हा बँक अधिकार्‍यांना जाब विचारला. यावेळी अधिकारी व शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांत शाब्दिक बाचाबाची झाली. कर्जबाजारी शेतकरी खंडेराव थेटे व शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी ठिय्या दिला. कर्जबाजारी शेतकरी खंडेराव पाटील यांनी, ‘जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी कर्ज परतफेडीस ६ महिने मुदतवाढ दिली असल्याचे सांगितले. तरीही अधिकारी त्यांच्या भूमिकेवर ठाम होते.

- Advertisement -

आधी मोठ्या पुढार्‍यांच्या मालमत्तेचे लिलाव करा

शेतकरी कर्जबुडवा नाही, आम्ही लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँक अध्यक्षांना निवेदने दिली आहेत. कोट्यवधींचे बेकायदा कर्ज लाटणारे सोडून शेतकर्‍यांच्या जमिनी लिलावात काढल्या जात असतील, तर आम्ही ते होऊ देणार नाही. आधी मोठ्या पुढार्‍यांच्या मालमत्तेचे लिलाव करा. कर्जवसुली अधिकार्‍यांना आम्ही जिल्हाभर गावबंदी करणार आहोत. – भगवान बोराडे, जिल्हा प्रवक्ता. शेतकरी संघटना.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -