Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र गुन्ह्यात मदत करण्याच्या मोहबदल्यात पोलिसाने मागितली लाच; सापडला 'एसीबी'च्या जाळ्यात

गुन्ह्यात मदत करण्याच्या मोहबदल्यात पोलिसाने मागितली लाच; सापडला ‘एसीबी’च्या जाळ्यात

Subscribe

नाशिक : अपहरणाच्या गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात ७ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना सहायक पोलीस निरीक्षकाला बुधवारी (दि.३) सायंकाळी ६ वाजेदरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. सागर डगळे असे लाचखोर सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. सागर डगळे याची २०२२ मध्ये सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विशेष सुरक्षा विभागाच्या निवड यादीत त्याचा समावेश होता. प्रति नियुक्तीचे आदेश नसल्याने डगळे सध्या उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्याचा भावाने प्रेमप्रकरणातून उपनगर हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा उपनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात तक्रारदाराच्या भावास अटक झाली होती. त्यानंतर सध्या तो जामीनावर सुटलेला आहे. तर, लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक सागर डगळे हा या गुन्ह्याचा तपास करीत आहे.

- Advertisement -

सदरील गुन्ह्याचे चार्जशीट दाखल करताना त्यात मदत करण्याच्या मोबदल्यात लाचखोर डगळे याने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यात तडजोड होऊन १० हजार रुपये देण्याचे ठरले. डगळे याने यापूर्वीही तक्रारदाराकडून तीन वेळा ऑनलाईन पैसे घेतलेले होते. दरम्यान, तक्रारदाराने यासंदर्भात मंगळवारी (दि. २) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून तक्रार केली होती. त्यानुसार लाचखोर डगळे यास बुधवारी (दि. ३) लाचेची ७ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

दरम्यान, ही कारवाई जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्या पथकाने सदरची कामगिरी बजावली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -