अशी आहे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची हिस्ट्री

The government report of the victim at Lingdev is also positive

मालेगावात करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होवून आता नाशिक शहरात बांधितांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याचे गेल्या पाच दिवसांतील आकडेवारीवरुन समोर आले आहे. शहरात नवीन आढळून आलेले १५ रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने करोनाबाधित झाले आहेत. बाधित रुग्णांचे मालेगाव व मुंबई कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. शहरात १८ प्रतिबंधित क्षेत्र असून शहरात एकूण ८८ बाधित रुग्ण आहेत. आता शहरात तीन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात रविवारी आढळून नवे १२ रुग्ण हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. ते बांधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पॉझिटिव्ह आले आहेत. सिडकोतील राणा प्रताप चौकातील एका कुटुंबातील दोन महिला करोनाबाधित आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे, या कुटुंबातील एक युवक आधीच बाधित असून त्यांच्या संपर्कात आल्याने दोन महिलांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुंबईवारी करणारा हॉटेल व्यवसायिक पॉझिटिव्ह

पंचवटीत आढळून आलेल्या बाधित हॉटेल व्यवसायिकांचे मुंबई व नाशिक मार्केटयार्ड येथे नियमित येणे-जाणे होते. त्यांचे नाशिक मार्केटयार्डमध्ये हॉटेल आहे. त्यांना शुक्रवारी, २२ मे २०२० रोजी त्रास होऊ लागल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. ते पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आज प्रशासनास प्राप्त झाला आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २८ संशयित व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

मालेगावला गेल्याने डॉक्टर झाले बाधित

गोविंदनगर येथील रहिवासी हे स्वतः डॉक्टर म्हणून मालेगाव येथे ७ दिवस कार्यरत होते. ते मालेगावहून आल्यानंतर त्यांचे २० मे रोजी स्वाब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खबरदारी म्हणून त्यांच्या राहत्या घराची इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे.

वडाळ्यात एकाच घरातील ५जण पॉझिटिव्ह

मुमताजनगर, वडाळ्यात आढळून आलेला पहिल्या रुग्णाचे पिंपळगाव ते मुंबई येणे-जाणे होते. ते कांदा वाहतूक करायचे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ५ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील १६, ७६ व ४२ वर्षीय पुरुष आणि १५ व १८ वर्षीय मुलींचा समावेश आहे.

मृत रुग्णाच्या मुलाची मुंबईवारी

संजीवनगर, सातपूर-अंबड लिंक रोड येथील मृत ७६ वर्षीय करोनाबाधित पुरुषाच्या संपर्कातील ३ व्यक्तींचा अहवाल करोनाबाधित असल्याचा प्राप्त झाला आहे. त्यात ८ वर्षीय व २ वर्षीय बालकाचा व १० वर्षीय बालिकेचा समावेश आहे. मृत व्यक्तीचा मुलगा अंत्यविधीसाठी मुंबईला गेला होता. त्याच्यामुळे घरातील सर्वांना करोनाची लागण झाली आहे.

बाधित पोलिसाचे मालेगाव कनेक्शन

कॉलेज रोड भागातील विसेमळा येथील रहिवाशी पोलीस बाधित आढळून आला आहे. ते मालेगावात बंदोबस्तासाठी गेले होते. त्यांच्या कुटुंबातील १७ वर्षीय व २३ वर्षीय मुली करोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. खबरदारी म्हणून महापालिकेतर्फे पोलिसाचे राहते घर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

औषध वितरक प्रतिनिधीचे ठाणे कनेक्शन

महाराणा प्रताप चौक, सिडको येथील ३१ वर्षीय औषध वितरक प्रतिनिधी कामानिमित्त ठाणे येथे गेला होता. तेथून परत आल्यावर ते बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्याच्या संपर्कात आल्याने कुटुंबातील आई, पत्नी, भावजय व वयोवृद्ध वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आठ परदेशी नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

परदेशातून नाशिक शहरात आलेले २४ नागरिकांना हॉटेल सेव्हन हेवन मध्ये ठेवण्यात आले होते. त्या सर्वांचे स्वाब तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी ८ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले आहेत. या ८ ही जणांना होम कोरंन टाईन करून घरी सोडण्यात आले आहे.