घरमहाराष्ट्रनाशिकस्मार्ट सिटी तोडणार रामसेतू; व्यावसायिक, नागरिक एकवटले

स्मार्ट सिटी तोडणार रामसेतू; व्यावसायिक, नागरिक एकवटले

Subscribe

व्यावसायिक, नागरिक एकवटले

पंचवटी : गोदावरी नदीवर ऐतिहासिक रामसेतू पूल हा पंचवटी आणि नाशिक शहराला जोडणारा मोठा दुवा आहे. हाच रामसेतू पूल तोडण्याच्या हालचाली स्मार्ट सिटी कंपनीकडून केल्या जात आहेत. या पुलावर गेल्या अनेक वर्षापासून अनेक छोटे व्यावसायिक आपला रोजगार करून पोट भरत आहेत. हा पूल कायमचा नष्ट करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून रामसेतू पूल बचाव अभियान सुरु करण्यात आले आहे. याबाबत कल्पना पांडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नारोशंकर मंदिराजवळील दोन सांडवे तोडण्यात आल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी रामसेतूचा मोठा आधार आहे. रामसेतू तोडला तर नाशिक शहर आणि पंचवटीतील रहिवाशांना मार्गक्रमणासाठी प्रचंड अडचणी येणार आहे. यासाठी रामसेतू तोडण्यास आमचा विरोध असल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, रामसेतू पुलाची उभारणी इंग्रज कालीन आहे, तरीही अनेक पुराचे तडाखे खात रामसेतू अजून ताठ मानेने उभा आहे. शासनाचा विकास करण्याचा उद्देश असला, तरी ऐतिहासिक स्थळे कशी टिकतील हेही बघावे.

- Advertisement -

ज्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रामसेतू तोडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्या कामाचे उखळ पांढरे होताना नाशिककरांनी बघितले आहे. पावसाळ्यात आलेल्या पहिल्या पुरातच गोदाकाठच्या फरशा उखडून गेल्या. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या विकासाबाबत कुठलीही सूसुत्रता दिसत नाही.

 रामसेतू तोडून नागरिकांचे पुन्हा एकदा हाल करू नये. यामुळे शेकडो कुटुंबं उदरनिर्वाहावाचून वंचित होतील. जाण्या-येण्याचा प्रश्न निर्माण होईल. विकासकामे जरूर करावीत, पण त्याने खरोखर विकास होतो की कुणाचे नुकसान होते हे बघणेही गरजेचे आहे. रामसेतू आहे त्या स्थितीत मजबुतीकरण व सुशोभिकरण करावे, ही मागणी केली जात आहे. रामसेतू तोडण्याची प्रक्रिया आहे त्या स्थितीत थांबवावी.

- Advertisement -

या प्रकरणामुळे काही अनर्थ झाल्यास त्याला स्मार्ट सिटीचे अधिकारीच जबाबदार राहतील. रामसेतू बचाव अभियान यशस्वी होण्यासाठी नागरिकांची स्वाक्षरी मोहीम हाती घेणार आहे. त्यास स्थानिकांचाही पाठिंबा आहे, असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
परिषदेस रामकुंड बचाव अभियानाच्या अध्यक्षा कल्पना पांडे, सुनंदा जगताप, स्वप्नील आहेर, सचिन खिंडारे, संदीप बोरकर, सुभाष पोतदार, संजय वाली, पार्वती गोसावी आदी उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -