घरमहाराष्ट्रनाशिक...तर माघार घेऊन, नीलिमा पवारांचा प्रचार करेन : माणिकराव कोकाटे

…तर माघार घेऊन, नीलिमा पवारांचा प्रचार करेन : माणिकराव कोकाटे

Subscribe

जागा बळकावल्याचा आरोपावर आमदार कोकाटेंचे प्रत्युत्तर

नाशिक : गंगापूर रोड येथील वाघ गुरुजी शाळेशेजारील जागा आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी बळकावल्याचा आरोप प्रगती पॅनलच्या प्रमुख नीलिमा पवार यांनी केल्यानंतर आमदार कोकाटेंनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. जागा संस्थेची नव्हे पालिकेने आरक्षण टाकलेली होती. ही जागा संस्थेची असल्याचे सिद्ध झाल्यास या निवडणुकीतुन जाहीरपणे माघार घेवून नीलिमा पवार यांचा प्रचार करेन, असे थेट आव्हान कोकाटे यांनी दिले आहे.

आमदार कोकाटे म्हणाले की, 4 जानेवारी 2010 रोजी शासनाकडून गायरान असलेली जागा शिवसरस्वती शिक्षण संस्था, सोमठाणे या नावाने घेतली. त्यानंतर सुमारे नऊ महिन्यानंतर डॉ. वसंत पवार यांचे निधन झाले. विशेष म्हणजे जेव्हा ही जागा शिवसरस्वती शिक्षण संस्थेने मागणी केली तेव्हा व त्यापूर्वी कुणीही या जागेची मागणी केलेली नव्हती. कारण त्याजागेवर नाशिक महानगरपालिकेने आरक्षण टाकलेले होते. विशेष म्हणजे वाघ गुरुजी शाळेच्या जागेवरही आरक्षण टाकलेले होते. ही जागा शिवसरस्वती शिक्षण संस्थेला शासनाने वितरित केली. त्या जागेवरील आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केला. त्यावेळी वाघ गुरुजी शाळेच्या जागेचेदेखील आरक्षण बदल करण्यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करुन 24 सप्टेंबर 2013 रोजी एकत्रित गॅझेट प्रसिद्ध केले.

- Advertisement -

आता या माध्यमातून आपल्यावर शिंतोडे उडवून काय उपयोग? त्याऐवजी माझ्यासह माझे सर्व सहकारी एवढे आरोप जाहीरपणे करीत आहे, त्याचे उत्तर का देत नाही? संस्थेमध्ये डोईजड कुणी नको असल्याने असे खोटे आरोप करून मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण ‘मविप्र’च्या सभासदांनी ‘परिवर्तन’चा निर्णय घेऊन टाकला आहे.

जिल्हा बँक बुडविल्याचा आरोप आपल्यावर मविप्रच्या राजकारणाच्या माध्यमातून केला जातो. परंतु, त्यावेळी केदा
आहेर हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते, हे कसे काय विसरतात? तसेच, निफाड सहकारी साखर कारखाना पूर्णपणे डबघाईस गेला, त्यावेळी कारखान्याचे चेअरमन माणिकराव बोरस्ते होते. हे विसरले का, असा परखड सवालदेखील कोकाटे यांनी विरोधकांना केला आहे.

- Advertisement -

विनायक शिंदे यांचेही आ. कोकाटेवर टिकास्त्र

 शेतकर्‍यांंची अर्थवाहिनी असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 25 वर्षे सातत्याने संचालक राहिलेले अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी बँक बुडण्यामागचे उत्तर अगोदर द्यावे. त्यानंतर नीतीमत्तेच्या गप्पा कराव्यात, अशी परखड टिका करत विनायक शिंदे यांनी जिल्हा बँकेतील कारभाराचा लेखाजोखाच मांडला. जिल्हा बँकेत कधीकाळी 5 हजार कोटींच्या ठेवी होत्या. 3 हजार कोटींचे कर्जवाटप केले जात होते. सद्यस्थितीत ठेवी हजार कोटींवर कशा आल्या, याचे उत्तर कोकाटेंनी द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले. कर्मचार्‍यांची भरती करण्यास परवानगी नसताना 400 सेवक दैनिक वेतनावर भरती करत 50 कोटी त्यांनी लाटले. नीलिमा पवार यांच्या कारभाराविषयी बोलण्यापेक्षा जिल्हा बँकेतील भ्रष्टाचाराचे प्रसिध्दी पत्रक का काढत नाही, असा सवालही शिंदे यांनी केला. वडनेर भैरव येथे प्रगती पॅनलतर्फे आयोजित प्रचार सभेत बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी रामकृष्ण पवार होते. व्यासपीठावर जेष्ठ नेते श्रीराम शेटे, रामचंद्र पाटील, नीलिमा पवार, यशवंत आहिरे, मनोहर देवरे, डॉ. सुनील ढिकले, उत्तम भालेराव, केदा आहेर, शंकर कोल्हे-खेडेकर, सुरेश निकम, सुरेश कळमकर, शिवाजी बस्ते, दिलीप मोरे, बाबाजी सलादे, मनोज शिंदे, दीपक पाचोरकर, डॉ. धीरज भालेराव, डॉ. विलास बच्छाव, सचिन पिंगळे, डॉ. प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिंदे पुढे म्हणाले की, 2004 साली देवळाली शाखेची इमारत बांधली तिचे इस्टिमेट 9 कोटी रुपये असताना बांधकाम पूर्ण होईपर्यंत तिचा खर्च तब्बल 15 कोटींपर्यंत गेला. सातत्याने तुम्ही 25 वर्षे बँकेत पदावर असताना बँक का बुडाली, याचे उत्तर द्यावे. जळगाव, सातारा, सांगली येथील जिल्हा बँकांची परिस्थिती चांगली असताना नाशिक जिल्ह्यातील बँक कुणामुळे बुडाली, याचे उत्तर द्यावे आणि नंतरच नीतीमत्तेच्या गप्पा माराव्यात, असे आव्हानही त्यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -