घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराजकीय सुंदोपसुंदीमुळे नाशिककरांना टँकरव्दारे पाणी पुरवठयाची वेळ

राजकीय सुंदोपसुंदीमुळे नाशिककरांना टँकरव्दारे पाणी पुरवठयाची वेळ

Subscribe

शहरातील प्रत्येक विभागात ३ टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन

नाशिक : मान्सूनवर ‘अल निनो’च्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पावसाची प्रतीक्षा कायम असतानाच नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. नाशिककरांना पाणी कपातीचे संकट ओढावू नये म्हणून तत्कालीन आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पाणी कपातीचा प्रस्ताव शासनाकडे दिला मात्र राजकीय विरोधामुळे हा प्रस्ताव अडकला. त्यातच शिंदे भाजप मधीत धुसफुशीमुळे हा विषय रखडला. आता पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखड्यानुसार विभागनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे अठरा टँकरची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.

जून महिन्यात दक्षिण प्रशांत महासागरात ‘अल् निनो’ वादळ उद्भवणार असल्याने मान्सूनचा पाऊस लांबण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने मार्चमध्येच वर्तविली होती. या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणाच्या उपाययोजना करण्याचे निर्देश राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार महापालिकेने टंचाई आराखडा तयार करीत एप्रिल महिन्यापासूनच आठवड्यातील एक दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे प्रस्तावित केले होते. आवश्यकतेनुसार जुन-जुलै महिन्यात आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव होता.

- Advertisement -

मात्र, पालिकेत सुरू असलेली प्रशासकीय राजवट आणि राजकीय गोटातून या पाणीकपातीला विरोध होऊ लागल्याने पाणीकपातीबाबत ‘आस्ते कदम’ची भूमिका घेण्यात आली. राजकीय विरोधामुळे महापालिका स्तरावर पाणीकपातीचा निर्णय होऊ शकला नसल्याने एप्रिलपासूनच पाणीकपात टळली होती. महापालिकेनेदेखील शासन निर्देश प्राप्त झाले नसल्याचे कारण पुढे करीत पाणीकपातीचा चेंडू शासनाच्या दिशेने टोलवला. मंत्रालयातही शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीमुळे हा निर्णय होऊ शकला नाही.

परंतु, या धोरणाचा फटका आता नाशिककरांना बसण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने महापालिकेला आरक्षण वाढवून दिले असले, तरी आरक्षित पाणी २० ऑगस्टपर्यंत पुरेल एवढेच शिल्लक आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा करायचा असल्यास आठवडातून एक दिवस कपात आवश्यक बनली आहे. परंतू महापालिकेला पुर्णवेळ आयुक्तच नसल्याने निर्णय होउ शकत नाही. त्यातच गंगापूर धरणात चर खोदण्याचा विषय मागे पडल्याने विभागनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा विभागात एकूण अठरा पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली जाणार आहे. त्या व्यतिरिक्त महापालिकेचे विभागनिहाय सहा टँकर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -