घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यातील उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या

जिल्ह्यातील उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या

Subscribe

निवासी उपजिल्हाधिकारीपदी डोईफोडे, खेडकर नाशिक पर्यटन उपसंचालकपदी

आगामी विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यात कार्यकाळ पूर्ण करणार्‍या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तर काही अधिकार्‍यांना प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, पर्यटन विकास विभागाचे प्रादेशिक अधिकारी नितीन मुंडावरे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांची बदली करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवडयात लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कार्यकाळ पूर्ण करणार्‍या, तसेच निवडणुकीशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबध येणार्‍या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश शासनाने शनिवारी उशिरा पारित केले. यात निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची पर्यटन विकास महामंडळाच्या उपसंचालकपदी प्रतिनियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर धुळे येथील भूसंपादन अधिकारी भागवत डोईफोडे यांची नियुक्ती झाली आहे. पर्यटन विभागाचे प्रादेशिक अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांची कोकण पर्यटन विकास महामंडळाच्या उपसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांची नगर शहर उपविभागीय अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर, सहायक आयुक्त उन्मेश महाजन यांची धुळे प्रशासन उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी राहूल पाटील यांची पालिका उपायुक्तपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण पदभार स्विकारतील. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश मिसाळ यांची जिल्हा पुरवठा अधिकारी पदी बदली झाली असून, त्यांच्या जागी बागलाणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भूसंपादन उपजिल्हाधिकारी स्वाती थविल यांची नगर येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – गोदाकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा


आनंदकर यांची तडकाफडकी बदली

लोकसभा निवडणूकीपुर्वीच नाशिक उपजिल्हानिवडणूक अधिकारी म्हणून पदभार स्विकारणारे अरूण आनंदकर यांची अवघ्या सहा महिन्यांतच तडकाफडकी बदली करण्यात आल्याने त्यांच्या बदलीमुळे महसूल विभागात वेगवेगळया चर्चा झडत होत्या. आनंदकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पदभार स्विकारत निवडणूका अतिशय शांततेत आणि पारदर्शीपणे पार पाडल्या. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच विधानसभा निवडणुकीच्या तयारीलाही सुरूवात केली होती. पुढील निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने निवडणूक विभागाने आनंदकर यांच्या नेतृत्वात सर्व तयारीही पूर्ण केली आहे. मात्र, शुक्रवारी अचानक आनंदकर यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले. याबाबत आनंदकर यांच्याशी संपर्क साधला असता बदली ही शासकीय प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. शनिवारी सकाळी त्यांनी तातडीने आपला पदभार सोडत कार्यमुक्त झाले. यातून त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली. आनंदकर यांच्या जागेवर महसूल प्रबोधिनीचे उपजिल्हाधिकारी कुंदन सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -