घरमहाराष्ट्रनाशिकनाशिककरांनो, विनामास्क फिराल तर ५०० रुपयांचा दंड

नाशिककरांनो, विनामास्क फिराल तर ५०० रुपयांचा दंड

Subscribe

बाजारपेठेत गर्दी करणार्‍यांवर कारवाईसाठी पालिकेची १८ पथके तयार

नाशिक :कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अक्षरश: हाहाकार उडाल्याची घटना ताजी असताना आता दिवाळीच्यानिमित्ताने विनामास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर न करता बाजारपेठेत गर्दी करणार्‍यांवर पालिकेने कारवाईसाठी १८ पथके तयार केली आहेत. आजपासून शहरातील सहा विभागात १८ पथकांकडून विनामास्क फिरणार्‍यांकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकट अद्यापही कायम असून अशात हलगर्जीपणा करून स्वत: व इतरांच्या जीवाला धोका पोहोचवण्याची कृती करणार्‍यांंविरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेने अक्षरश: तांडव केले. या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट ते तिप्पट रुग्ण आढळले, तसेच मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली. मार्च, एप्रिल, मे या दोन महिन्यांत शहरात अडीच लाख नागरिकांना कोरोना झाला. मूळात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात लग्नसोहळे व अन्य कामानिमित्त बाहेर पडताना नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित वावर या त्रिसुत्रीला फाटा दिला होता. प्रशासन घसा फोडून सांगत असताना, नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट विध्वंसकारी ठरली.

- Advertisement -

आता कोरोनाची तिसरी लाट केव्हाही येवू शकते अशी परिस्थिती आहे. त्यात शेजारील नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून जिल्ह्यातील येवला, सिन्नर व निफाड याठिकाणीही रूग्ण संख्या वाढत आहे. दुसरीकडे, नाशिक शहरात दिवाळीनिमित्त बाजारपेठेत तुफान गर्दी होत असून लस घेतल्यामुळे आता केरोना होणार नाही या मानसिकतेतून अनेक नागरिक मास्क न घालताच बाजारपेठेत फिरत आहेत. ही बाब लक्षात घेत राज्याच्या आरोग्य विभागाने नाशिक महापालिकेला मास्कसह कोरोना नियमांचे पालन करण्याचे पत्र पाठवले असून त्यानुसार मास्क न घालणार्‍यासह कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. प्रत्येक विभागात तीन पथके असणार असून त्यात वैद्यकीय अधिकारी, विभागीय स्वच्छता निरीक्षक, विभागीय कार्यालयातील एक कर्मचारी या पथकात असणार आहे. शहरातील बाजारपेठा, दुकानदार, मोठे सुपरमार्केट, शॉपिंग मॉल्स आणि हॉटेल्ससह सरकारी आस्थापनांममध्ये तपासणी करून नियम न पाळण्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

सरकारी कर्मचारीही रडारवर

तिसरी लाट थोपवण्यासाठी नागरिकांबरोबरच सरकारी व खासगीत कर्मचार्‍याचे लसींचे दोन डोस पूर्ण झालेले असावेत अशीही सक्ती केली आहे. कार्यालयांत येणारे नागरिक तसेच कर्मचारी मास्क लावत नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -