घरमहाराष्ट्रAmravti Lok Sabha : नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार, भाजपाची सातवी यादी...

Amravti Lok Sabha : नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार, भाजपाची सातवी यादी जाहीर

Subscribe

भाजपाने लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली असून यामध्ये खासदार नवनीत राणा यांची घोषणा केली आहे. राणा यांना अमरावती लोकसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : गेल्या बऱ्याच दिवसांपासून सस्पेन्स असलेल्या अमरावती लोकसभेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आज (ता. 27 मार्च) भाजपाने लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली असून यामध्ये खासदार नवनीत राणा यांची घोषणा केली आहे. राणा यांना अमरावती लोकसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता 2019 च्या लोकसभेत अपक्ष निवडणूक लढलेल्या नवनीत राणा 2024 च्या लोकसभेत मात्र भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. (Navneet Rana has been announced as Amravati Lok Sabha candidate from BJP)

हेही वाचा… Lok Sabha 2024 : जाहिरातीतील आजोबांची दृष्टी 10 वर्षांत बदलली, एनसीपी-एसपीचा महायुतीवर निशाणा

- Advertisement -

भाजपाकडून उमेदवारांची सातवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये अनपेक्षित अशा नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राणा यांना भाजपाकडून उमेदवारी मिळणार, हे निश्चित होते. परंतु, राणा यांचा बोगस जातप्रमाणपत्राचा निकाल सर्वोच्च न्यायालयात निकाली असतानाच भाजपाने उमेदवारी जाहीर केल्याने याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, यामुळे आता महायुतीत मिठाचा खडा पडल्याचेही बोलले जात आहे. कारण राणांच्या उमेदवारीला अनेकांकडून तीव्र विरोध करण्यात आलेला आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये नवनीत राणा यांनी संसदेत भाजपला पूरक भूमिका घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. त्यामुळे नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळणार, हे जवळपास निश्चित होते. मात्र, त्यांच्या या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांच्याकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. राजकारण सोडावे लागले तरी चालेल, पण मी नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका अडसूळ यांच्याकडून घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सुद्धा राणांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. पण या सर्व विरोधातूनही भाजपाकडून राणांनाच उमेदवारी देण्यात आल्याने यामुळे आता पुढे काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

नवनीत राणा यांच्या बोगस जातप्रमाणपत्राचा निकाल हा 1 एप्रिलला सुप्रीम कोर्टात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर का हा निकाल राणांच्या बाजूने लागला असता तर भाजपाकडून 4 एप्रिलला त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, भाजपाने त्याआधीच राणांना उमेदवारी जाहीर करत मोठे स्फोट केला आहे. त्यामुळे 2019 ला अपक्ष लढून विजयी झालेल्या नवनीत राणा 2024 च्या लोकसभेत भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -