अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच महायुतीत सामील असलेले प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदार संघावर दावा ठोकला होता. मात्र आज भाजपाने आपली सातवी यादी करताना महाराष्ट्रातून अपक्ष आमदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नवनीत राणा यांना भाजपाने अमरावतीतून तिकीट दिले आहे. त्यामुळे आता बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांचा प्रचार करणार नसून त्यांना 100 टक्के पाडणार असा इशारा दिला आहे. (Bacchu Kadu VS Navneet Rana Navneet will defeat Rana 100 percent in elections Bachu Kadus warning)
हेही वाचा – ED : पंतप्रधान मोदींचा नवा विचार; ईडीने जप्त केलेला पैसा सामान्यांना कसा परत करता येणार?
नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बच्चू कडू म्हणाले की, भाजपाने त्यांचं काम केलं आहे, आता आम्ही आमचं काम करू. आमच्या नवनीत राणांना कायम विरोध राहणार आहे. आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार अजिबात करणार नाही. नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आता कोणासमोर नाराजी व्यक्त करण्याची गरज नाही, विषय संपला आहे. परंतु नवनीत राणा यांना ही निवडणूक अजिबात सोपी जाणार नाही. नवनीत राणा यांचा विजय होणार नाही याची खात्री करु आणि 100 टक्के त्यांना पाडणार, असा निर्धार बच्चू कडू यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. नवनीत राणा यांचा पराभव कसा करायचा हे आम्ही ठरवू. परंतु आम्ही नवनीत राणा यांचा विरोधात प्रचार करताना आम्हाला महायुतीत ठेवायचं की नाही याचा निर्णय ते घेतील, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा – Jitendra Awhad : मविआबाबत आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांना हात जोडून केली विनंती, म्हणाले…
दरम्यान, नवनीत राणा यांना भाजपाच्या नेत्यांसह आमदार बच्चू कडू यांनी देखील थेट विरोध केला होता. राणा यांच्याकडून प्रहारच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे त्यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यास आमच्याकडून देखील उमेदवार रिंगणात उतरवला जाईल असा इशारा बच्चू कडू यांनी याआधी दिला होता. इतकंच नाही तर बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावून त्यांच्यासोबत चर्चा देखील केली होती.