घरताज्या घडामोडीशरद पवारांशी चर्चेनंतरच राष्‍ट्रवादी-भाजप सरकार, फडणवीसांचा पुनरुच्चार; पवारांनी फेटाळला दावा

शरद पवारांशी चर्चेनंतरच राष्‍ट्रवादी-भाजप सरकार, फडणवीसांचा पुनरुच्चार; पवारांनी फेटाळला दावा

Subscribe

शिवसेना-भाजपमधील विधानसभा 2019 निकालानंतरच्या काडीमोडानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू असतानाच राज्यात स्थिर सरकार हवे म्हणून राष्ट्रवादीकडून आम्हाला सत्तास्थापनेसाठीचा प्रस्ताव आला. या प्रस्तावानुसार आम्ही इतर कुणाशीही नव्हे, तर थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच चर्चा केली. यामध्ये सत्तास्थापनेविषयी आमच्यात काही गोष्टी ठरल्या. परंतु ऐनवेळी त्या गोष्टी कशा बदलल्या ते सर्वांनीच बघितले, असे म्हणत शरद पवार यांच्याशी चर्चेनंतरच राज्यात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खरे तर फडणवीसांनी याआधीही 3 ते 4 वेळेस जाहीर कार्यक्रमांमध्ये या सत्तास्थापनेला शरद पवारांची संमती असल्याचे सांगितले होते. त्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोस्ट अनप्रेडिक्टेबल राजकारणी अशी ओळख असलेले शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फडणवीसांच्या या दाव्यानंतर तरी शरद पवार याबाबतीत खरे काय यावर बोलणार का? अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि काँग्रेसच्या वर्तुळात देखील सुरू झाली आहे.

- Advertisement -

सन 2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासह सत्तापदांच्या समसमान वाटणीवरून 25 वर्षे युतीत राहिलेल्या भाजप-शिवसेनेचा अनपेक्षितरित्या काडीमोड झाला. या काडीमोडानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू असतानाच अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी उरकून मोठा राजकीय भूकंप केला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर अजित पवारांना माघारी बोलवताना झालेले राजकीय नाट्य अवघ्या देशाने बघितले. अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन स्वगृही परतताच त्यांच्या पाठिंब्यावर स्थापन झालेले भाजपचे औटघटकेचे सरकार अवघ्या 72 तासांत कोसळले. हे सरकार स्थापन करण्यासाठी पडद्यामागे नेमकी कुणी सुत्रे हलवली, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

परंतु ही जुळवाजुळव सुरू असतानाच स्थिर सरकार हवे म्हणून राष्ट्रवादीनेच आमच्यापुढे प्रस्ताव ठेवल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ज्यावेळी तुमच्यासोबत कुणी दगाबाजी करतो त्यावेळेस तुमच्यासमोर फार चॉईस नसतो, त्यामुळे आम्हीही राष्ट्रवादीचा प्रस्ताव स्वीकारून सत्तास्थापनेवर बोलणी सुरू केली. ही चर्चा आम्ही थेट शरद पवारांसोबतच केली होती, परंतु ऐनवेळी ज्या गोष्टी बदलल्या त्या सर्वांनीच बघितल्या. त्यामुळे त्याठिकाणी आमच्यासोबत विश्वासघात झाला. पण पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, असे फडणवीस म्हणाले. अजितदादांनी आमच्यासोबत घेतलेली शपथ फसवणुकीच्या नाही तर प्रामाणिक भावनेतून घेतली होती. पण नंतर ते कसे तोंडघाशी पडले हे अजितदादा सांगतील, त्यांनी नाही सांगितले तर मी सांगेन, असेही फडणवीस म्हणाले. त्यावर मला वाटले होते, देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारची स्टेटमेंट्स करतील, असे मला कधी वाटले नव्हते, असे म्हणत शरद पवारांनी फडणवीस यांचा दावा फेटाळून लावला आहे.

राज्यात स्थिर सरकार हवे म्हणून राष्ट्रवादीकडून आम्हाला सत्तास्थापनेसाठीचा प्रस्ताव आला. या प्रस्तावानुसार आम्ही इतर कुणाशीही नव्हे, तर थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच चर्चा केली. यामध्ये सत्तास्थापनेच्या काही गोष्टी ठरल्या. परंतु ऐनवेळी त्या गोष्टी बदलल्या ते सर्वांना माहीत आहे.

– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मला वाटले होते, देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारची स्टेटमेंट्स करतील, असे मला कधी वाटले नव्हते.

-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -