‘तुम्हाला द्रोह वाटत असेल, तर केस दाखल करा’; अजित पवारांचे खुले आव्हान

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. त्यावेळी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला तसेच, आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले.

संग्रहित छायाचित्र

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. त्यावेळी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला तसेच, आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला. ‘तुम्हाला द्रोह वाटत असेल, तर करा केस दाखल’, अशा शब्दांत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. (NCP Leader Ajit Pawar Slams dcm devendra Fadnavis)

अजित पवार यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “मला पुन्हा पुन्हा हे विषय वाढवायचे नाहीत. मला माझे काम करत राहायचे आहे. आम्ही आमच्या कामाला आणि लोकांच्या प्रश्नाला महत्त्व देतो. त्यांनी काय म्हणावे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे. तुम्हाला जर द्रोह वाटत असेल, तर त्यात केस दाखल करा. ही केस नियमात बसते का? आम्ही जिवात जीव असेपर्यंत छत्रपतींच्या विचारांशी आमच्याकडून कधीही द्रोह होणार नाही. आमच्या पुढच्या १० पिढ्यांमध्येही तसा द्रोह होणार नाही. उगीच त्यांनी काहीतरी बोलायचे”, असे अजित पवार यांनी म्हटले.

पुढे अजित पवार म्हणाले की, “प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. राज्यघटनेचे पालन सगळ्यांनी केले पाहिजे. मी मांडलेली भूमिका सगळ्यांना पटलीच पाहिजे, असे माझे म्हणणे नाही. पण मी मांडलेली भूमिका चुकीची ठरवणारे ते कोण? माफी मागण्याइतका मी काय गुन्हा केलाय? किंवा अपशब्द वापरलाय? राज्यपाल, सत्ताधारी मंत्री आणि आमदारांनी बेताल वक्तव्य केली, अपशब्द वापरले, त्याबाबत कुणी बोलायला तयार नाही. कारण नसताना वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करतात. हे बरोबर नाही. त्यांना त्यांची जी भूमिका मांडायची, ती त्यांनी मांडावी. आम्हाला जी भूमिका मांडायची, ती आम्ही मांडू”.


हेही वाचा – महाराष्ट्र भवनावरून संजय राऊतांचे सरकारला थेट आव्हान; म्हणाले, पहा जमतंय का!