Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र जे. डे. हत्येप्रकरणी छोटा राजनसह ९ जणांना जन्मठेप

जे. डे. हत्येप्रकरणी छोटा राजनसह ९ जणांना जन्मठेप

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ पत्रकार जे. डे. यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजन याच्यासह ९ जणांना दोषी ठरवण्यात आले असून, या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पत्रकार जिग्ना वोरा हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याशिवाय सिमकार्ड पुरवल्याचा आरोप असणाऱ्या पॉल्सन जोसेफ याचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सर्व आरोपींना आर्म्स अॅक्ट आणि मोक्का कायद्यातील वेगवेगळ्या कलमांखाली २६ लाखांचा दंड भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हा दंड न भरल्यास शिक्षेत वाढ होणार आहे. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून छोटा राजन न्यायालयात उपस्थित होता.

राजनसह ‘हे’ ९ जण दोषी

छोटा राजन याच्यासह सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी आणि दीपक सिसोदिया हे ९ जण दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. फिर्यादी वकिलांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर अर्थात माध्यमांवर हल्ला झाला असल्याकारणाने हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण ग्राह्य धरत जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी केली होती.

काय आहे नेमकं प्रकरण?

- Advertisement -

११ जून २०११ रोजी ज्येष्ठ पत्रकार जे. डे. दुचाकीवरून पवई येथील निवासस्थानी जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. पाच गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झालेल्या जे. डे. यांनी हिरानंदानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या गुन्ह्याचा सुरुवातीचा तपास मुंबई गुन्हे शाखेने केला. या तपासातून जे. डे. यांची हत्या संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजनच्या इशाऱ्यावरून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी जे. डे. यांच्यावर गोळ्या झाडणारा सतीश थंगप्पन जोसेफ ऊर्फ सतीश काल्या आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून या हत्याकांडासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेल्या, सहभाग घेतलेल्या एकूण १२ आरोपींना मोक्का अन्वये गजाआड केले गेले. त्यात पत्रकार जिग्ना वोराचाही समावेश होता. जे. डे. हत्या प्रकरणी १३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा फरार आहे. तत्कालीन सहआयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांच्या देखरेखीखालील अरुण चव्हाण, नंदकुमार गोपाळे, श्रीपाद काळे, रमेश महाले आणि पथकाने तपास करत पुरावे गोळा केले होते.

मृत्यूआधी जे. डे. यांनी ‘चिंधी रॅग्ज टू रिचेस्ट’ या पुस्तकाचे टिपण तयार केले होते. ‘या पुस्तकातून जे. डे. बदनामी करणार. तसेच डे यांच्या पुस्तकातील माहितीमुळे प्रतिस्पर्धी टोळीकडून धोका निर्माण होऊ शकतो’, अशी भीती असल्यामुळे राजनने सतीश काल्याला जे. डेंच्या हत्येचे आदेश दिले होते.

- Advertisement -

सतीश काल्या, अनिल वाघमोडे, अभिजीत शिंदे, नीलेश शेडगे, अरुण डोके, मंगेश आगावणे, सचिन गायकवाड या आरोपींचा डे यांच्या हत्येत थेट सहभाग होता. राजनचा बालपणीचा मित्र विनोद असरानी ऊर्फ विनोद चेंबूर याने मुलुंडच्या हुमा पॅलेस बारमध्ये जे. डे. यांची ओळख पटवून दिली. पॉल्सन जोसेफ आणि रवी रत्तेसर यांनी आरोपींना ग्लोबल सिमकार्ड पुरवली, आर्थिक मदतही केली. तर जे. डे. यांच्या विरोधात राजनचे माथे भडकावण्याचे काम जिग्नाने केले, असा आरोप गुन्हे शाखेने आरोपपत्रातून ठेवला. राजनला अटक करण्यात आल्यानंतर अन्य गुन्ह्यांसोबत जे. डे. हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला होता.

जे. डे. हत्याकांडातील एक आरोपी

जे. डे. यांच्या नातेवाईकांचा बोलण्यास नकार

दरम्यान, या खटल्याचा निकाल लागल्यानंतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जे. डे. यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानी गेले. मात्र, जे. डे. यांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

- Advertisement -