घरमहाराष्ट्रअॅक्सेसरीजमुळे वाढली मोबाईलची किमंत, पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण

अॅक्सेसरीजमुळे वाढली मोबाईलची किमंत, पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण

Subscribe

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या महिला व बालविकास विभागाने केलेल्या मोबाईल खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या आरोपाला आता उत्तर देण्यात आले आहे.

अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यासाठी महिला व बालविकास विभागाने निविदा काढली होती. १०६ कोटींच्या या खरेदीप्रकरणात ६५ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता. या आरोपाला आता पंकजा मुंडेच्या विभागामार्फत उत्तर देण्यात आले आहे. ‘स्मार्ट फोनसोबत मुलांची पोषणविषयक माहिती अपलोड करण्यासाठी मोबाईल डिव्हाईस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, ३२ जीबी डाटाचे एसडी कार्ड, डस्ट प्रूफ पाऊच, स्क्रिन प्रोटेक्टर आदी साहित्याचा त्यात समावेश आहे. निविदा प्रक्रियेत मान्य करण्यात आलेली किंमत ही फक्त स्मार्टफोनची नसून ती या सर्व साहित्यांची एकत्रित किंमत आहे’, असे महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

अंगणवाडी सेविकांना देण्यात येणाऱ्या स्मार्टफोनच्या खरेदीसंदर्भात विधान परिषद विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने महिला आणि बालविकास विभागाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पोषणासंदर्भातील माहिती जलदगतीने उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने राज्यातील अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीची सर्व प्रक्रिया ही जीईएम पोर्टलवर अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाली असून त्यानंतर शासनाची राज्यस्तरीय खरेदी समिती आणि उच्च अधिकार समितीच्या मान्यतेने एल १ निविदाधारकास स्मार्ट फोन पुरवठ्याचे आदेश देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

काय होता मुंडे यांचा आरोप – चिक्कीनंतर मोबाईल खरेदीत १०६ कोटींचा घोटाळा

अंगणवाडी सेविकांना माहिती अपलोड करण्यासाठी Eluga I7 या स्मार्टफोनच्या एन्टरप्राईज इडिशनची खरेदी केली जाणार आहे. मूळ Eluga I7 या स्मार्टफोनच्या तुलनेत एन्टरप्राईज इडिशन असलेल्या स्मार्टफोनची क्षमता, प्रोसेसर स्पीड अधिक आहे. ऑपरेशन सिस्टीमही अत्याधूनिक आहे. याशिवाय वॉरंटी कालावधीही अधिक असून सर्व जिल्ह्यांमध्ये स्पेशल सर्व्हीस सपोर्ट दिला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये अंगणवाडीतील बालकांची तसेच पोषणाची माहिती अपलोड करण्यासाठी आवश्यक असलेले मोबाईल डिव्हाईस मॅनेजमेंट हे सॉफ्टवेअर, माहीती संकलीत करण्यासाठी ३२ जीबी डाटाचे एसडी कार्ड, डस्ट प्रूफ पाऊच, स्क्रिन प्रोटेक्टर आदी साहित्याचा त्यात समावेश आहे. या सर्व साहित्यासह स्मार्टफोनच्या किंमतीस निविदा प्रक्रियेत मान्यता देण्यात आली आहे. तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एकूण स्मार्टफोनच्या ५ टक्के अतिरिक्त साठा (बफर स्टॉक) यानुसार ५ हजार १०० एवढे स्मार्टफोन अतिरिक्त घेण्यात आलेले आहेत, असे महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -