राज्यातील काही भागांत हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट; ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका

Unseasonal Rain

पुणे : राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) वादळी वाऱ्यासह थैमान घातले असून आजही काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसणार आहे. नंदूरबार, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, मराठवाडा, पुणे, अहमदनगर आणि परभणी या ठिकाणी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान (Damage to agricultural crops) झाले आहे. दरम्यान, आज देखील हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.

दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये शनिवारी (6 मे) कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्यामुळे राज्यातील आद्रता कमी होणार आहे, तर कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात दुपारनंतर काही ठिकाणी मेगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई आणि पुणे यांच्याकडून पुढील काही दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे आहे. यानुसार दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोपडून काढले आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे, पुणे, सातारा, नांदेड, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट पावसाची शक्यता असल्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

गुरुवारी राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली आहेत. सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. राज्यातील नंदूरबार, बुलढाणा, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात काल अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे कांदा, मका, भाजीपाला, फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

हवामान विभागाने सांगितले आहे की, पुढील पाच दिवस आकाश निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेघ गर्जना, वीजांचा कडकडाट व हलक्या किंवा अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ८ मे रोजी आकाश दुपारी किंवा संध्याकाळी अंशत: ढगाळ राहणार आहे, तर ९ मे व १० मेला निरभ्र राहण्याची शक्यता आहे.