कसाबचा मोबाईल परमबीर सिंहांकडे, दहशतवाद्यांना मदत केल्याचा समशेर खान पठाण यांचा आरोप

मुंबई पोलिस आयुक्तांकडे शमशेर खान पठाण यांची तक्रार

Parambir Singh

मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाबच्या मोबाईलच्या निमित्ताने परमबीर सिंह यांच्याविरोधात एक तक्रार समोर आली आहे. मुंबई पोलिस दलातील एका माजी पोलिसानेच ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये निवृत्त पोलिस अधिकारी समशेर खान पठानने परमबीर सिंह यांच्याविरोधात अतिशय गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केली असून मुंबईवरील हल्ल्याचा दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल मागील १३ वर्षे परमबीर सिंह यांनी लपवून ठेवला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळेच परमबीर सिंह यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी, अशीही शमशेर खान पठान यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली आहे. (Parambir singh took ajmal kasab mobile post 26/11 investigation alleged shamsher khan pathan)

काय आहेत तक्रारीतील आरोप ?

परमबीस सिंह यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील दोषी असलेला दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल आपला ताब्यात घेतला. २६/११ हल्ल्यात मुंबई पोलिसांनी कसाबला ताब्यात घेतल्यानंतर हा मोबाईल कसाबकडून जप्त केला होता. पण तपासादरम्यान कसाबचा हा मोबाईल तत्कालीन डीआयजी (ATS) यांनी आपल्या ताब्यात घेतला. पण हा मोबाईल आपल्या ताब्यात घेऊन त्यांनी दहशतावाद्यांना आणि पाकिस्तानातील शत्रूंना मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आपल्या देशातच असणाऱ्या शत्रूंचीही मदत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची दखल गंभीरपणे घ्यावी अशीही विनंती करण्यात आली आहे. तसेच या प्रक्रियेत तपास अधिकारी असणाऱ्या महाले आणि माळी या अधिकाऱ्यांकडूनही याबाबतची माहिती घ्यावी असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. सध्या होमगार्डचे महासंचालक असलेले परमबीर सिंह यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांकडे असणाऱ्या मोबाईलच्या माध्यमातूनच त्यांचे हॅण्डलर्स हे हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांना सूचना देत होते. त्यामुळेच तपासातील अत्यंत महत्वाचा असा पुरावा म्हणजे अजमल कसाबचा मोबाईल होता. कसाबला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तपासा दरम्यान अनेक पोलिस अधिकारी हे डी बी मार्ग पोलिस ठाण्यात येत होते. त्यामध्ये तत्कालीन डीआयजी एटीएस परमबीर सिंह हेदेखील एक होते. या प्रकरणात कसाबचा मोबाईल हा पायधुनी पोलिस ठाण्याचे हवालदार कांबळे यांनी घेतला होता. पण परमबीर सिंह यांनी तो मोबाईल कांबळेंकडून काढून घेतला. याबाबत मी वरिष्ठांनाही कल्पना दिली. पण पुढे या प्रकरणात तपासातून मला बाजुला करण्यात आले. त्यामुळेच या प्रकरणात पुढे काय झाले याची माहिती मला मिळाली नाही. पण या प्रकरणात कसाबकडून कोणताही मोबाईल मिळाल्याचा पुरावा हा न्यायालयीन सुनावणी प्रकरणातही दिसून आला नाही. सध्या मी निवृत्त असून सामाजिक कार्य करत आहे. या फोनमध्ये अतिशय महत्वाचे पुरावे असू शकतात असाही दावा त्यांनी केला आहे.


Parambir Singh : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल