Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र भाग २ : वेबसिरिज, चित्रपटांमुळे किशोरांमध्ये वाढतेय महिलांविषयी आकर्षण

भाग २ : वेबसिरिज, चित्रपटांमुळे किशोरांमध्ये वाढतेय महिलांविषयी आकर्षण

Subscribe

नाशिक : शाळा, सैराट, फँड्री, बीपी चित्रपटांच्या अफाट यशानंतर अल्पवयीन मुलांच्या प्रेम कथांना अचानकपणे महत्व प्राप्त झाले. त्यातून गेल्या दोन वर्षात याविषयावर मोठ्या प्रमाणात वेब सिरिज तयार करण्यात आल्यात. यात शालेय विद्यार्थ्याचे आपल्या शिक्षिकेवर प्रेम असणे किंवा लहान मुलाचे आकर्षणाचा केंद्रबिंदू त्याची मामी असणे यांसारखे विषय चघळले गेलेत. या वेबसिरिजचा जबरदस्त पगडा किशोरवयीन मुलांवर असल्याने त्यांचे अनुकरण प्रत्यक्ष आयुष्यातही ते करीत असल्याचे वास्तव, नाशिकमधील मानसोपचार तज्ज्ञांशी चर्चा केली असता पुढे आले आहे.

बदलत्या काळानुरुप शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल झाला असून, अभ्यासासाठी मोबाईल, लॅपटॉपसह इंटरनेटचा वापर करणे बंधनकारक झाले आहे. मात्र, किशोरवयीन मुले अभ्यासाच्या नावाने मोबाईलचा वापर करीत असतांना वेबसिरिज बघण्यात रमून जात असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. या संदर्भात ‘आपलं महानगर’ने काही चित्रपट दिग्दर्शकांशी चर्चा केली असता, चित्रपट आणि वेबसिरिज निर्मिती करणार्‍या काही कंपन्यांना किशोरवयीन मुलांच्या प्रेमकथा दाखवण्यात अधिक रस असल्याचे त्यांनी सांगितले. अशा कथानकांमुळे टीआरपीत मोठी वाढ होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे असे कथानक असलेले चित्रपट आणि वेबसिरिजची निर्मिती केली जाते.

- Advertisement -

त्यात विशेषत: वेबसिरिजमध्ये अश्लिल दृष्टांचा भडीमार असतो. वेबसिरिजला सेन्सार बोर्डाचे बंधनच नसल्याने मर्यादा सोडून त्या प्रदर्शित केल्या जातात. त्यातील अश्लिल दृष्यांमुळे किशोरवयीन मुलांच्या लैगिंक भावना चाळावल्या जातात. बहुतांश वेबसिरिजमध्ये किंवा रिल्समध्ये लहान मुलांचे शिक्षकांप्रती असलेले आकर्षणाला दाखवले जाते. तसेच पवित्र नातेसंबंधांची तमा न बाळगता आई, बहीण, वहिणी, मामी आदी नात्यातील व्यक्तींशी शरीरसंबंध प्रस्थापित केले जात असल्याचे दाखवले जाते. ही दृश्य इतकी प्रभावीपणे दाखवली जातात की, त्यांचा पगडा मुलांच्या मेंदूवर बसतो. त्यातून मुले अशा गोष्टींचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. किशोरवयात मुलामुलींमध्ये शारीरिक बदल होत असतांनाच चित्रपट वा वेबसिरिज बघून जवळच्या व्यक्तींबद्दल आकर्षण निर्माण होते. या आकर्षणाला ते सरळपणे प्रेमाच्या संकल्पनेत बसवतात. अशा वेळी काय करावे व काय करु नये, याची माहिती मुलामुलींना नसते. अशा वेळी मुले आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तींकडून शरीर सुखाची अपेक्षा करतात. बर्‍याचदा ही मुले संबंधिताकडे व्यक्तही होतात. मात्र समोरुन नकार आल्यास त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य होण्याची दाट शक्यता असते.

नाशिकमध्ये मुलांना वयाने मोठ्या असलेल्या महिलांविषयी आकर्षण वाढत असल्याचे समोर आले आहे. किशोरवयीन मुलामुलींमध्ये लैंगिक भावना निर्माण होणे चुकीचे नाही. मात्र, ती भावना कोणत्या वयात व कोणाकडे व्यक्त करावी, याची शिक्षकांसह पालकांनी मुलामुलींना जाणीव करुन द्यावी. प्रेमभावनेचे फायदे व तोटे समजणे गरजेचे आहे. पालकांनी मुलामुलींशी संवाद ठेवला पाहिजे. : डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचार तज्ज्ञ

आपले मत व्हॉट्सअ‍ॅपवर कळवा

शहरासह जिल्ह्यातील असंख्य बालकांमध्ये मोठ्या वयाच्या व्यक्तींचे आकर्षण वाढत आहे. त्यातून पुढे गंभीर गुन्हे घडण्याचेही प्रमाण वाढले आहे. ज्या वयात खेळ खेळले जावेत, अभ्यास करावा त्या वयात मुले प्रेमात पडत असल्याने त्याचे दूरगामी परिणाम समाजात घडत आहेत. या मुळे सामाजिक स्वाथ्यावर परिणाम होतो. मुलांच्या भविष्यकालीन वाटचालीवरही परिणाम होतो; शिवाय पवित्र नातेसंबंधांचे महत्वही पुसट होते. नाशिकमध्ये अलिकडेच घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘आपलं महानगर’मध्ये ‘उमलत्या वयातील आकर्षण’ या वृत्तमालिकेव्दारे प्रकाशझोत टाकला जात आहे. अशा घटना घडूच नये, यासाठीच्या उपाययोजना या मालिकेव्दारे सुचवण्यात येणार आहेत. यासंदर्भातील आपली मते आणि प्रतिक्रिया 9022557326 या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर संदेशस्वरुपात पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -