घरमहाराष्ट्रAwad vs. Ajit Pawar : घरातीलच लोकांनी पुरावे दिले, जितेंद्र आव्हाडांचा अजित...

Awad vs. Ajit Pawar : घरातीलच लोकांनी पुरावे दिले, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा

Subscribe

शरद पवार यांनी ज्यांना हाताला धरून चालायला शिकवले. त्यांनीच पायात पाय घालून पाडण्याचे जे तंत्र वापरले आहे, त्यासाठी खेद आणि खंत हे दोन्ही शब्द कमी पडतील, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2019मध्या आम्हाला भाजपमध्ये पाठवले आणि त्यानंतर गेल्यावर्षी ते स्वतः भाजपासोबत आले, असे वक्तव्य धाराशिवच्या मल्हार पाटील यांनी केले आहे. त्याचाच संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार पवार यांच्यावर शरसंधान करताना, घरातीलच लोकांनी पुरावे दिले असल्याची टीका केली आहे. (Pawar vs Pawar: Awhad claims that there is a conspiracy to break the NCP since 2014)

राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेले विधान हे सत्याला अनुसरूनच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे कटकारस्थान 2014पासूनच सुरू झाले होते. पडद्यामागून हालचाली सुरू होत्या. त्याचाच एक भाग म्हणून भाजपासोबत गेलेले नेते नित्यनियमाने शरद पवार यांच्या कानात ‘भाजपासोबत जाऊया’, असे सांगत होते, असा दावा डॉ. आव्हाड यांनी केला आहे.

- Advertisement -

अजित पवार यांच्यासोबत जे चार नेते गेले आहेत, ते या कटाचे सूत्रधार होते. याच चौघांच्या मदतीने अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते भाजपाला दिले आणि निवडूनही आणले. हे सर्व जेव्हा मी बोलायचो तेव्हा, माझ्याकडे काय पुरावा आहे, अशी विचारणा व्हायची. पण, आज घरातल्याच लोकांनी पुरावे दिले आहेत, असे त्यांनी सुनावले आहे.

- Advertisement -

शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा कट अनेक वर्षांपासून सुरू होता. पण, हा सुरूंग घरातच लावला जाईल, असे वाटले नव्हते. हा सुरूंग कोणी लावला हे आता सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वच्छपणे उघडकीस आले आहे, असे सांगून जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या संपविणे हे अजित पवार यांच्या मनातच होते. त्यामुळेच ते शरद पवार यांना अडचणीत आणण्याची कोणतीही संधी सोडत नव्हते.

सन 2019साली पहाटेचा शपथविधी करून त्यांनी पवारांना अडचणीत आणले होते. 2023 साली शरद पवार यांनी रक्ताचे पाणी करून जन्म दिलेला आणि वाढविलेला पक्ष फोडून पुन्हा शरद पवार यांनाच अडचणीत आणले. शरद पवार यांनी ज्यांना हाताला धरून चालायला शिकवले. त्यांनीच पायात पाय घालून पाडण्याचे जे तंत्र वापरले आहे, त्यासाठी खेद आणि खंत हे दोन्ही शब्द कमी पडतील, असे सांगतानाच, आता याबाबत योग्य तो खुलासा करावा. अर्थात, तो खुलासा करताच येणार नाही. कारण, सत्य हे कटू नव्हे तर ‘कडू’ आणि पचवायलाही अवघड असते. त्यांना उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता बनवणे ही चूकच होती, अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -