मतिमंद मुलांच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा ;दोघांचा मृत्यू

डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज; उलट्या होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर दोघे गंभीर

my mahanagar

इगतपुरी : शहरातील मतिमंद मुलांच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून यात उलट्या होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन विद्यार्थी अत्यंत अस्वस्थ असून त्यांना नाशिकला जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठवण्यात आले आहे. तसेच चार विद्यार्थ्यांवर इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती समजताच ग्रामीण रुग्णालयात तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख हे विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करत असून एवढी मोठी घटना घडूनही इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप इंगोले व भरारी पथक अधीक्षिका डॉ. स्वरूपा देवरे मात्र गैरहजर आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन नसल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आल्याने नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला ज़ात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी शहरात अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कारण बधीर निवासी विद्यालय, रखमाबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र असे मतिमंद विद्यालय चालवणार्‍या संस्थां आहे. या विद्यालयात १२० विद्यार्थी असून मंगळवारी रात्री खिचडीचे जेवन केल्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास यातील ८ विद्यार्थ्यांना उलटयाचा त्रास सुरु झाला. यामुळे या विद्यार्थ्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर दोन विद्यार्थ्यांची प्रकृति चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. चार विद्यार्थ्यांवर येथे उपचार सुरू आहेत.

 पहाटेपासून विद्यार्थ्यांना त्रास सुरू होता. या घटनेत हर्षल गणेश भोईर (वय २३, रा. भिवंडी, जि. ठाणे) व मोहम्मद जुबेर शेख (वय ११, रा. नाशिक) या दोन जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. तर प्रथमेश नीलेश बुवा (वय १७) व देवेंद्र कुरुंगे (वय १५) या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिकला पाठवण्यात आले आहे. तर उर्वरित मुलांची तपासणी सुरू केली आहे. तसेच या विद्यार्थ्यांनी खाल्लेल्या अन्नाचे सँपल जमा केले असून या घटनेत मृत झालेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. ग्रामीण रुग्णालयात पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक वसंत पथवे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, मुख्याधिकारी पंकज गोसावी, नायब तहसीलदार प्रवीण गुंडाळे, आरोग्य निरीक्षक यशवंत ताठे यांच्यासह शहरातील विविध पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या घटनेचा आवाज इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला असून घटनेतील दोषींवर कडक कारवाईची मागणी अधिवेशनात केली आहे.

मतिमंद मुलांच्या शाळेत घडलेला हा प्रकार अतिशय गंभीर असून या घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्यक्तीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
– वसिम सैयद, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी