घरमहाराष्ट्रRaigad Accident : पाली-खोपोली महामार्गावर तीन अपघात

Raigad Accident : पाली-खोपोली महामार्गावर तीन अपघात

Subscribe

रायगड जिल्ह्यातील पाली-खोपोली महामार्गावर सोमवारी एकाच दिवशी तीन अपघात झाले. यात एकाचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत.

पाली : राज्य महामार्ग पाली-खोपोली सध्या मृत्युचा सापळा होताना दिसत आहे. सोमवारी (१५ एप्रिल) या मार्गावर तब्बल तीन अपघात झाले. या तीन अपघातांमध्ये एकाचा मृत्यू झाला तर इतर जखमी आहेत. हे तिन्ही अपघात भालगुळ, वऱ्हाड आणि नाणोसे या गावांच्या हद्दीत झाले आहेत.
वाकण-पाली खोपोली राज्य महामार्गाचे नुकतेच रुंदीकरण झाले आहे. त्यामुळे वाहने भरधाव वेगाने चालवले जातात. अतिवेग आणि बेदरकार वाहनचालक यामुळे वारंवार येथे दुर्घटना होतात. या मार्गावर सोमवारी वऱ्हाड गावच्या हद्दीत सायंकाळच्या सुमारास पालीकडून परळीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मोटरसायकलस्वाराने खोपोलीहून पालीकडे जाणाऱ्या कारला धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार जबर जखमी झाला तर दोन्ही गाड्याचे मोठे नुकसान झाले.
दुसरा अपघात नानोसे गावच्या हद्दीत नायरा पेट्रोलपंपाजवळ झाला. एका मोटारसायकलस्वाराने भर वेगात रिक्षेला ओव्हरटेक करत असताना खोपोलीहून पालीकडे जाणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात ओव्हरेटेक करणाऱ्या मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या मोटरसायकलवरील चालक आणि त्याची पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. यात रिक्षेलाही धडक दिल्यामुळे रिक्षा उलटली आणि त्यातील प्रवासी जखमी झाले.
तिसरा अपघात पाली-खोपोली महामार्गावरील भालगुळ गावच्या हद्दीत घडला. पालीकडून खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या कारला खोपोलीहून पालीकडे जाणाऱ्या मोटरसायकलने जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार आणि त्याची पत्नी जखमी झाले. तसेच कार आणि मोटारसायकलचेही नुकसान झाले.
या तिन्ही अपघातामध्ये मोटरसायकल प्रामुख्याने आहे. तिन्ही अपघात एकाच महामार्गावर एकाच दिवशी झाल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. चालकांनी गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांनी प्रयत्न करावेत, त्यांना शिस्त लावावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -