घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराज ठाकरेंची मध्यस्थी : जिल्हा बँकेच्या कारवाईतून शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्र्यांचे कारवाई थांबवण्याचे...

राज ठाकरेंची मध्यस्थी : जिल्हा बँकेच्या कारवाईतून शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्र्यांचे कारवाई थांबवण्याचे आदेश

Subscribe

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मागील काही महिन्यापासून शेतकऱ्यांवर धडक वसुली मोहीम राबवण्यात येत आहे.  याबाबत शेतकरी वेळोवेळी आवाज उठवताना दिसून येत आहेत. मात्र, त्याची कुठलीही दखल घेतली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हा प्रश्न थेट राज ठाकरे यांच्या दरबारी मांडला. बुधवारी (दि२०) शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मनमानी वसूली थांबवण्याचे आदेश देत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे थकीत कर्ज वसूल करण्यासाठी मागील काही महिन्यापासून विशेष वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांवर मनमानी पद्धतीने व्याज आकारणी तसेच इतर शुल्क लावून अव्वाच्या सव्वा रकमेची मागणी केली जात आहे. जे शेतकरी कर्जफेड करण्यास असमर्थ आहेत तसेच त्यांचा जादा व्याजाला व इतर शुल्काला विरोध आहे अशा शेतकऱ्यांवर थेट 101 व 100/185 या कलमाअंतर्गत कारवाई करून त्यांच्या शेतजमिनी जप्त करण्यात येत आहेत किंवा त्या जमिनीवर स्थानिक सोसायटी व जिल्हा बँकेचे नाव लावण्याची सुलतानी कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत होता. या संदर्भात निफाड तालुक्यातील शेतकरी मागील १८ दिवसापासून उपोषण करीत होते. नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनी आपली व्यथा राज ठाकरे यांच्याकडे मांडली. ठाकरे यांनी आपल्या नियोजित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या बैठकीवेळी या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची देखील मुख्यमंत्री यांच्याशी भेट घालून देता त्यांची व्यथा मुख्यमंत्र्यांजवळ मांडली.

- Advertisement -

शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ सर्व अन्यायकारक कारवाया थांबवण्याचे आदेश दिले. तसेच या सर्व प्रकरणी सचिव स्थरावर चौकशी होऊन मध्यम मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांमुळे नाशिक जिल्ह्यातील कर्जदार तब्बल ६५ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान यावेळी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळा समवेत नाशिक मधील मनसे पदाधिकारी माजी महापौर अशोक मूर्तडक, पराग शिंत्रे, अंकुश पवार, अनंत सांगळे, मनोज घोडके, तुषार गांगुर्डे, अमित गांगुर्डे, संजय देवरे, महेश लासुरे आदि उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -