राऊतांना झालेली अटक बेकायदेशीर, पीएमएलए कोर्टाने ईडीला झापलं

मुंबई – पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी मिळून हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यांच्या घरात छापेमारी करून ईडीने त्यांना ताब्यात घेतलं. संपूर्ण चौकशीअंती ईडीने त्यांना अटक केली. ३१ जुलै रोजी त्यांना अटक करण्यता आली होती. मात्र, ईडीने केलेली अटक बेकायदेशीर होती, असा महत्त्वाचा निर्वाळा पीएमएलए कोर्टाने दिला. यावरून पीएमएलए कोर्टाने ईडीला झापलं आहे.

हेही वाचा – अखेर संजय राऊत तुरुंगाच्या बाहेर येणारच, हायकोर्टाचा जामिनीच्या स्थगितीस नकार

पीएमएलए कोर्टाने १२२ पानी आदेशपत्र जारी केले आहेत. संजय राऊतांना झालेली अटक बेकायदेशीर होती. या प्रकरणात ईडीने आपल्या मर्जीने आरोपी निवडले. राकेश आणि सारंग वाधवान हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना अवैधरित्या पकडलं, असं पीएमएलए कोर्टाने त्यांच्या आदेशात म्हटलं आहे. तसंच, संजय राऊत आरोपी आहेत, याचे पुरावे द्या असंही कोर्टाने ईडीला म्हटलं आहे.

दिवाणी खटले हे मनी लाँड्रिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून आणि अटक करून अशा परिस्थितीत आणणं हे न्यायालय मान्य करू शकत नाही. प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी खटल्यात अटक करण्यात आली तर संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक केली गेली असल्याची महत्त्वाची टिप्पणीही पीएमएलए कोर्टाने केली.

कथित पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून संजय राऊत तुरुंगात आहेत. अटक केल्यानंतर संजय राऊत यांना सुरुवातीला ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या अटकेनंतर संजय राऊत आर्थर रोड कारागृहामध्येच होते.

हेही वाचा – पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर

याप्रकरणी ईडीने अधिक तपास करत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला होता. मात्र राऊतांचा या घोटाळ्याशी काहीच संबंध नाही असा युक्तीवाद राऊतांच्या वकिलांनी केला. परंतु, ईडीकडून राऊत हेच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला गेला.

दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. पंरतु, या जामीनाला ईडीने विरोध केला होता. ईडीने केलेली याचिका पीएमएलए कोर्टाने फेटाळून लावल्याने ईडीने याविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली. मुंबई हायकोर्टानेही ईडीची याचिका फेटाळून लावत संजय राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला. संजय राऊतांच्या सुटकेचे आदेश निघताच आर्थर रोड तुरुंगाबाहेरअसलेल्या पत्रपेटीत हे आदेश पत्र टाकण्यात आले आहे. त्यानुसार, आज सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर ते बाहेर येतील, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.