घरमहाराष्ट्रराजीनाम्यावरून खटके, उमेदवारी लटके

राजीनाम्यावरून खटके, उमेदवारी लटके

Subscribe

ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यास महापालिकेकडून मंजुरी नाही, न्यायालयात याचिका दाखल

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारीवरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांच्या महापालिका सेवेतील राजीनाम्यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खटके उडत आहेत. महापालिका प्रशासनाने त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर न केल्याने याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राजीनाम्याच्या या वादात मात्र उमेदवारीचा पेच कायम आहे.

राज्यात सत्तांतर घडवून आणताना केलेल्या राजकीय धक्कातंत्राचा वापर भाजप अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत करण्याची दाट शक्यता आहे. ही पोटनिवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला लढायला लावून त्यांच्या गटाला आयात उमेदवार देण्याची तयारी भाजपने ठेवली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे.

- Advertisement -

अंधेरी पोटनिवडणुकीतील भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांनी आपला प्रचार सुरू केला आहे, मात्र भाजपने अद्याप पटेल यांची उमेदवारी घोषित केलेली नाही, तर शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांना आपल्याकडे खेचण्याचा एकनाथ शिंदे गटाचा प्रयत्न आहे. लटके यांनी शिंदे गटाची ऑफर नाकारली तर मुरजी पटेल यांना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्याची रणनीती भाजपने आखली आहे, परंतु लटके उमेदवार नसतील तर शिंदे गटाला पोटनिवडणूक लढण्यात फारसे स्वारस्य नाही. तरीही शिंदे गट मुरजी पटेल यांना घेऊन अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्याची शक्यता आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शुक्रवारी शेवटची मुदत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी ४८ तास शिल्लक असताना उद्धव ठाकरे गट आणि भाजपने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने उमेदवारी नक्की केली आहे, मात्र त्यांचा मुंबई महापालिकेतील नोकरीचा राजीनामा मंजूर झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेसमोर लटके यांच्या उमेदवारीचा पेच आहे. लटके यांची उमेदवारी तांत्रिक अडचणीत अडकली तर ठाकरे गटाने दुसरा पर्याय तयार ठेवला आहे.

- Advertisement -

बहुतांश पोटनिवडणुकीत मतदारांची सहानुभूती ही दिवंगत आमदाराच्या कुटुंबातील व्यक्तींना असते. त्यामुळे भाजप या पोटनिवडणुकीबाबत अधिक सावध आहे. राज्यात झालेले सत्तांतर आणि नजीकच्या काळात होऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका यामुळे भाजपसाठी ही पोटनिवडणूक कसोटीची आहे. अलीकडच्या राजकीय घटनांमुळे मुंबईकरांची सहानुभूती उद्धव ठाकरेंकडे असल्याचे वातावरण आहे. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अंधेरीत शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अंधेरीची पोटनिवडणूक सोपी असणार नाही याचा अंदाज भाजपला आला आहे. परिणामी अंधेरीची पोटनिवडणूक शिंदे गटाला लढायला भाग पाडून त्यांच्या गळ्यात मुरजी पटेल यांची उमेदवारी बांधण्याची भाजपची खेळी आहे.

ऋतुजा लटके न्यायालयात
दरम्यान, ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी मुंबई पालिका प्रशासनाकडे आपल्या पालिका नोकरीचा राजीनामा दिलेला आहे. राजीनामा मंजूर करावा यासाठी त्यांनी नियमानुसार एका महिन्याचे वेतनही पालिका कोषागारात जमा केले आहे, मात्र महापालिकेने अद्याप त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. पालिकेच्या या वेळकाढूपणामुळे त्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. मुंबई पालिकेने माझा राजीनामा मंजूर करावा, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी न्यायालयात केली असून या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

नियम सगळ्यांसाठी सारखेच
कुणाच्याही राजीनाम्याबाबत काही नियम असतात. त्या नियमाने राजीनामा स्वीकारायचा असतो. मुंबई महापालिका स्वायत्त आहे. महापालिका याबाबत निर्णय घेऊ शकेल, मी काही सांगू शकत नाही. नियम सगळ्यांसाठी सारखेच असतात. लटके यांचा राजीनामा न स्वीकारण्याबद्दल सरकारकडून दबाव आणण्याचे कारण नाही.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

माझ्यावर सरकारचा दबाव नाही
ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत प्रक्रिया सुरू आहे, मात्र पालिका नियम असे सांगतो की, एखाद्या कर्मचार्‍याने आपल्या नोकरीचा राजीनामा सादर केला तर ३० दिवसांत त्याबाबत निर्णय घेता येतो. ऋतुजा लटके यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा हा ३ऑक्टोबर रोजी सादर केला आहे, मात्र माझ्यावर राज्य सरकारचा कोणताही दबाव नाही.
– इकबालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका

आमची निष्ठा उद्धव ठाकरे यांच्याशी
मला शिंदे गटाकडून कोणतीही ऑफर आलेली नाही. ५ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याची माहिती खोटी आहे. मी त्यांना भेटलेले नाही. आमची निष्ठा उद्धव ठाकरे यांच्याशी आहे. माझे पती रमेश लटके त्यांचीही निष्ठा उद्धव ठाकरेंशी आणि बाळासाहेब ठाकरेंशीच होती.
– ऋतुजा लटके

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -