संजय राऊतांना अखेर अटक, ईडीकडून तब्बल १७ तास चौकशी

संजय राऊतांच्या घरी साडे अकरा लाख रुपयांची रोकड सापडली असून ईडीने ही रक्कम जप्त केल्याचे समजते. 

sanjay raut and ed

शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर रात्री उशिरा ईडीने अटक केली. ईडी कार्यालयात आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. पत्राचाळ प्रकरणी १०३४ कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान चौकशीदरम्यान, संजय राऊतांच्या घरी साडे अकरा लाख रुपयांची रोकड सापडली असून ईडीने ही रक्कम जप्त केल्याचे समजते. तसेच, आज सकाळी साडेनऊ वाजता त्यांची जेजे रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केल्यानंतर अकरा वाजता पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे.

हेही वाचा – संजय राऊतांच्या घरातून साडे अकरा लाखांची रोकड जप्त

रविवार सकाळी सात वाजल्यापासून ईडीने संजय राऊत यांच्या घरी धाड टाकून चौकशी सत्र सुरू केले होते. घरात साडेनऊ तास चौकशी केल्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात नेण्यात आले होते. त्यानंतर ईडी कार्यालयातही त्यांची आठ तास चौकशी करण्यात आली. म्हणजेच तब्बल १७ तासांहून अधिक तास त्यांची चौकशी झाली. संजय राऊत यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसंच, पत्राचाळ प्रकरणी एकही कागद ईडीला मिळाला नसल्याची माहितीही वकिलांनी दिली. चौकशीदरम्यान दिल्लीचे अधिकारी मुंबईत आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ जमीनप्रकरणी १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते, मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला असा आरोप आहे.

प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणार्‍या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे ३ हजार घरांचे बांधकाम करायचे काम दिले होते. त्यापैकी ६७२ घरे येथील भाडेकरूंना द्यायची होती. उर्वरित घरे म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती, परंतु २०१०मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर्स एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.