धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचेच राहील, संजय राऊतांचा दावा

धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे आणि यापुढेही कायम राहिल, असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी आज नाशिकमध्ये  पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.

sanjay raut

बंडखोर आमदारांनी शिवसेनेत फुट पाडून भाजपसोबत युती स्थापन केली आहे. सध्या राज्यात युतीचे सरकार असून उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेचे धनुष्यबाणाचे चिन्ह अबाधित राखण्यासाठी धडपड सुरू आहे. दरम्यान, कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या या प्रकरणात कोणाच्या बाजूने निकाल लागेल याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेने नव्या चिन्हासाठी तयार राहावं असं सूचक वक्तव्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच केले होते. दरम्यान, आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचा दावा केला आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे आणि यापुढेही कायम राहिल, असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी आज नाशिकमध्ये  पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. (Sanjay Raut on shivsena party symbol Bow and Arrow)

हेही वाचा – जब खोने के लिए कुछ भी ना बचा हो तो…, संजय राऊतांचं सूचक ट्विट

सध्या राज्यात शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरून राजकारण सुरू आहे. शिंदे गट या बाणावर दावा करणार की उद्धव ठाकरे यांच्याकडेच हे चिन्ह राहणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. निकाल काहीही लागू शकतो, त्यामुळे शिवसैनिकांनी तयार राहावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यामुळे संजय राऊतांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईतील १०० हून अधिक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने नाशिकमध्येही तसेच होणार का याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, नाशिकचे सर्व नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. काही कारणासाठी नगरसेवक व्यस्त आहेत. त्यामुळे ते येथे येऊ शकले नाहीत. मात्र, सर्वच नगरसेवक आमच्यासोबत असून नाशिकमध्ये शिवसेना जागच्या जागी आहे, असं राऊत म्हणाले.

हेही वाचा – कल्याणमध्येही शिवसेनेत फूट, 40 आजी-माजी नगरसेवक शिंदे गटात

भाजपकडून शिवसेना कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण शिवसेना जिद्दीने कामाला लागली असून शिवसेना आणखी पुढे गेलेली दिसेल. भाजपला शिवसेना संपवायची आहे. शिवसेना संपली तर महाराष्ट्राचे तुकडे करण्याचं धोरण त्यांना पूर्ण करता येईल. मुंबई स्वतंत्र करता येईल, म्हणूनच ते शिवसेनेच्या मागे लागले आहेत. शिवसेनेच्या लोकांनाच हाताशी धरून ते शिवसेना संपवायचा प्रयत्न करत आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.

सरकार बेकायदेशीर

नव्याने आलेले सरकार बेकायदेशीर आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असताना बहुमताचा ठराव राज्यपालांनी घ्यायाला लावणं हे बेकायदेशीर आहे. अध्यक्षपदासाठी आम्ही तारीख मागितली होती, पण आम्हाला तारीख दिली नाही. राज्यपाल घटनेचे पालन करणारे नाहीत, एकतर्फी पद्धतीने निर्णय घेतले गेले, असं संजय राऊत म्हणाले.