घरमहाराष्ट्रमुंबईतील शाळा आजपासून सुरू होणार

मुंबईतील शाळा आजपासून सुरू होणार

Subscribe

पहिली ते सातवीचे साडेदहा लाख विद्यार्थी जाणार शाळेत

ओमायक्रॉनचे विषाणू सापडल्याने 1 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपासून इयत्ता 1 ली ते 7 वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. त्यानुसार 15 डिसेंबरपासून मुंबईतील सर्व व्यवस्थापन व मंडळाच्या शाळा सुरू करण्यास मुंबई महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व माध्यमाच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांची घंटा वाजणार असून, सुमारे साडेदहा लाख विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शाळा सुरू होणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेष म्हणजे प्रत्यक्ष उपस्थितीबरोबरच ऑनलाईन वर्गही सुरू राहणार असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या. मुंबईमध्ये 4 ऑक्टोबरपासून इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू झाले. या वर्गांनाही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पहिली ते सातवीचे वर्गही सुरू करण्याची मागणी पालकांकडून होऊ लागली. याची दखल घेत राज्य सरकारने राज्यामध्ये पहिली ते चौथी व मुंबईमध्ये पहिली ते सातवीचे वर्ग 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन सापडल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवर टाकण्यात आला. मात्र, आता मुंबई महापालिकेने 15 डिसेंबरपासून शहरातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याला पालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार मुंबईतील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व मंडळांशी संलग्न शाळा आणि सर्व माध्यमांच्या शाळांना वर्ग सुरू करण्यासंदर्भातील आदेश शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या 3420 शाळा असून, या शाळांमध्ये सुमारे साडेदहा लाख विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यापूर्वी त्यांच्या पालकांचे संमतीपत्र आवश्यक असणार आहे. संमतीपत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच शाळेत परवानगी देण्यात येणार आहे. सोमवार ते बुधवारपर्यंत शाळा भरणे बंधनकारक करण्यात आले असून, प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये अशा सूचनाही पालिकेकडून शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

प्रत्यक्ष वर्गासह ऑनलाईनही सुरू राहणार
मुंबईमध्ये 15 डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू होणार आहेत. मात्र, सध्या सुरू असलेले ऑनलाईन वर्गही कायम ठेवण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्गाची सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

शाळा सुरू करणे बंधनकारक नाही
पहिली ते सातवीपर्यंतच वर्ग 15 डिसेंबरपासून सुरू होणार असले तरी ज्या शाळांची तयारी पूर्ण झाली नाही त्या शाळांना घाईगडबडीत शाळा सुरू करू नये. शाळा व्यवस्थापनाना एक-दोन दिवस उशिरा शाळा सुरू करण्यास पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील सर्वच शाळा 15 डिसेंबरला सुरू झाल्या नाही, तरी पुढील काही दिवसातच त्या शाळा सुरू होतील.

पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या शाळा : 3420
पालिकेच्या एकूण शाळा : 1159
विद्यार्थ्यांची संख्या : सुमारे साडेदहा लाख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -