घरमहाराष्ट्रपत्नीचा होतोय दुसरा विवाह; पतीची हायकोर्टात धाव, पोलीस करणार चौकशी

पत्नीचा होतोय दुसरा विवाह; पतीची हायकोर्टात धाव, पोलीस करणार चौकशी

Subscribe

अमर मोहिते

मुंबईः माझ्या पत्नीचा जबरदस्तीने दुसरा विवाह होत आहे. त्यामुळे माझ्या पत्नीला न्यायालयात हजर करा, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका पतीने उच्च न्यायालयात केली आहे.

- Advertisement -

न्या. रेवती मोहिते-ढेरे व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. पत्नीचा विवाह नक्की जबरदस्तीने करण्यात येत आहे की तिच्या इच्छेने दुसरा विवाह होत आहे, याची चौकशी पोलीस करणार आहेत. या चौकशीची माहिती न्यायालयाला देण्यात येईल, असे पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने ही सुनावणी उद्या, ३ मेपर्यंत तहकूब केली.

याचिकाकर्ता पती खार येथे राहणारा आहे. माझे वय ३२ आहे. पत्नीचे वय २७ आहे. आमचा विवाह २७ मे २०१५ रोजी झाला. माझ्या व पत्नीच्या कुटुंबीयांच्या संमतीने हा विवाह झाला आहे. विवाहानंतर आम्ही दोघे खार येथे राहत होतो. विवाहानंतर दोन महिन्यातच ऑगस्ट २०१५ मध्ये पत्नी घर सोडून गेली. मी तिला घटस्फोट दिलेला नाही. तरीही पत्नीचा ७ मे २०२३ रोजी जबरदस्तीने दुसरा विवाह करण्यात येत आहे. त्यामुळे तिला न्यायालयात हजर करा, अशी मागणी पतीने याचिकेत केली आहे.

- Advertisement -

मात्र पत्नीचा दुसरा विवाह जबरदस्तीने केला जातोय की तिच्या संमतीनेच हे सर्व होत आहे याची चौकशी केली जाईल व त्याची माहिती उद्या, बुधवारी सकाळी साडेदहा वाजता न्यायालयात दिली जाईल, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. याची नोंद करुन घेत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली.

हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह झाला असल्यास घटस्फोट घेतल्याशिवाय दुसरा विवाह करता येत नाही. घटस्फोटासाठी रितसर कुटुंब न्यायालयात अर्ज करावा लागतो. घटस्फोटाचे वैध कारण द्यावे लागते. कुटुंब न्यायालय त्या कारणाची शहानिशा करते. तडजोडीसाठी न्यायालयाकडून प्रयत्न होतो. त्यानंतर न्यायालय घटस्फोट मंजूर करते. याप्रकरणात पतीने दावा केला आहे की घटस्फोट झालाच नाही आणि पत्नीचा दुसरा विवाह होत आहे. त्यामुळे पोलीस चौकशीत नेमकं काय समोर येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -