घरमहाराष्ट्रअंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल, नेमकी काय आहे रणनीती?

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल, नेमकी काय आहे रणनीती?

Subscribe

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी तर भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांनी आज उमेदवारीचा अर्ज दाखल केला. दोन्ही बाजूंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. परंतु ठाकरे गटाचा सावध पवित्रा म्हणून शिवसेनेकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दिवंगत आमदार रमेश लटके यांचे निकटवर्तीय संदीप नाईक यांनीही अर्ज भरला आहे. अर्ज भरल्यानंतर कुठलाही दगाफटका होऊ नये, या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ही खबरदारी घेतल्याचं समजतं.

नेमकी काय आहे रणनीती?

- Advertisement -

शिवसेनेचे माजी मंत्री अनिल परब यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, हा एक नियम असतो. आयोगाच्या नियमानुसार एबी फॉर्ममध्ये पर्यायी उमेदवाराचं नाव समाविष्ट करता येऊ शकतं. अधिकृत उमेदवारानं काही कारणास्तव माघार घेतल्यास किंवा छाननीत त्याचा अर्ज बाद झाल्यास दुसरा उमेदवार अधिकृतरित्या जाहीर केला जातो. त्याच अनुषंगाने संदीप नाईक यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. कोणत्याही प्रकारचा ठाकरे गटाला दगाफटका होऊ नये, याची खबरदारी घेत शिवसेनेकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

ऋतुजा लटके यांना उमेदवारी अर्ज भरता येणार की नाही याचीच निश्चिती आधी नव्हती. महापालिकेतील त्यांच्या राजीनाम्याचे प्रकरण थेट उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच निकाली निघाले. उच्य न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने लटके यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर लटके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला. दुसरीकडे ही निवडणूक भाजप लढणार की बाळासाहेबांची शिवसेना याचा उलगडा आज सकाळपर्यंत झाला नव्हता. अखेर भाजपचे उमेदवार म्हणून मुरजी पटेल हेच अर्ज भरणार हे निश्चित झाले.

- Advertisement -

ऋतुजा लटके यांचा अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप उपस्थित होते. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेससोबत कम्युनिस्ट पक्षानेही ठाकरे गटाला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे मुरजी पटेल यांनीही शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, शिंदे गटाचे प्रवक्ते आणि माजी मंत्री दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, नितेश राणे हे उपस्थित होते.

या निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांसाठी तसेच भाजपसाठीही निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार आहे. दरम्यान, आगामी काळात मुंबई महापालिकेसह सर्व महत्वाच्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक होणार आहेत. त्यामुळे या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटासाठी महत्वाचा ठरणार आहे.


हेही वाचा : रमेश लटके आज असते तर शिंदे गटात असते, नारायण राणेंचं मोठं वक्तव्य


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -