बरेच धक्के भाजप- मिंधे गटास पचवायचेत, ही तर सुरुवात; ठाकरे गटाचं टीकास्त्र

shiv sena saamana uddhav thackeray slams bjp shinde fadanvis govt shinde group on graduate and teacher constituencies

राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मविआ सरकारने भाजपला मोठा धक्का दिला. या निवडणुकांमध्ये भाजपला केवळ एक जागा जिंकता आली, यावरून शिवसेनेचे ( ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून आज शिंदे फडणवीस सरकारव टीकास्त्र डागण्यात आलं आहे. पदवीधर-शिक्षकांनी दिलेला हा कौल म्हणजे महाराष्ट्राचे ताजे जनमानस आहे. आणखी बरेच धक्के भाजप व मिंधे गटास पचवायचे आहेत. ही तर सुरुवात आहे, असं म्हणत शिवसेनेने शिंदे – फडणवीस सरकारला एक आव्हानचं दिलं आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ म्हणजे भाजपची मक्तेदारी राहिलेली नाही व विधान परिषद निवडणुकीचे ताजे निकाल ही भाजप-मिंधे सरकारला चपराक आहे, असही सामनातून म्हटलं आहे. नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला. पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे राजकीय वर्चस्व. तरीही भाजप पराभूत होतो, असंही सामनातून म्हटलं आहे.

राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकांचे निकाल म्हणजे महाराष्ट्राची मन की बात आहे. पाचपैकी फक्त एक जागा भाजपास मिळाली. भाजपचा व त्यांच्या मिंधे गटाचा सपशेल पराभव झाला. फडणवीस-मिंधे सरकारच्या खोटारडेपणास ब्रेक लागणारे हे निकाल आहेत. नागपूर शिक्षक, अमरावती पदवीधर, संभाजीनगर शिक्षक, नाशिक पदवीधर, कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका पार पडल्या. पदवीधर-शिक्षक म्हणजे संपूर्ण सुशिक्षित मतदार अशा निवडणुकीतून आपले प्रतिनिधी विधिमंडळात निवडून पाठवतो. पैकी कोकण मतदारसंघात (शिक्षक) भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे हे विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा पराभव करून निवडून आले. बाळाराम पाटील हे शे. का. पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीत उभे होते. पण महाराष्ट्र विकास आघाडीने त्यांना पाठबळ दिले. तरीही कोकणातील शिक्षक मतदारांनी यावेळी वेगळा निकाल दिला. संपूर्ण महाराष्ट्रात भाजप-मिंधे गटाची पिछेहाट होत असताना कोकणात हा एकमेव विजय त्यांना मिळाला. यात भाजपपेक्षा शिक्षक उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे कर्तृत्व जास्त. म्हात्रे हे काही मूळचे भाजपचे नाहीत. भाजपला रेडीमेड उमेदवार हाती लागले. योगायोगाने ते जिंकले इतकेच, असा टोलाही ठाकरे गटाने शिंदे फडणवीस सरकारला लगावला आहे.

कोकणातील शिक्षक मतदारसंघातील विजय हा शिवसेनेस धक्का वगैरे असल्याची आवई उठवली जात आहे. तो शुद्ध मूर्खपणा आहे. महाराष्ट्रातील इतर चार जागांवर भाजपच्या हाती भोपळा लागला. त्यावर जरा बोला. सगळ्यात जास्त वादात आणि गर्जत राहिली ती नाशिक पदवीधरांची निवडणूक. येथे काँग्रेसचे जुनेजाणते उमेदवार सुधीर तांबे यांनी घोळात घोळ घातला व ऐन वेळेस माघार घेऊन सत्यजीत तांबे या आपल्या चिरंजीवास अपक्ष म्हणून अर्ज भरायला लावला. पिता की पुत्र हे आधीच ठरवायला हवे होते. मतदारसंघात तांबे आणि काँग्रेसने मतदारांची नोंदणी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत तांबे हेच जिंकणार होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सत्यजीत हे भाचे. त्यामुळे मामांची कोंडी झाली, असही ठाकरे गटानं सामनातून म्हटलं आहे.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वास हा नगरचा तिढा शांत डोक्याने व सन्मानाने सोडवता आला असता. झाकली मूठ तशीच ठेवून सत्यजीत तांबे हेच काँग्रेसचे उमेदवार असा पवित्रा घेता आला असता. पण तांबे यांच्या निमित्ताने मामांची जिरवता येईल काय? असा डाव कदाचित असावा. त्यात किती तथ्य ते त्यांनाच माहीत, पण शेवटी ऐन वेळेस अपक्ष शुभांगी पाटील यांच्या पाठिंब्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला व त्यांच्या विजयासाठी शर्थ करूनही सत्यजीत तांबे हे विजयी झाले. राष्ट्रवादीही मनाने तांबे यांच्याबरोबर होती काँग्रेसचा मोठा गट तांबे यांच्या मागे उभा राहिला. राष्ट्रवादीही मनाने तांबे यांच्याबरोबर होती. मुख्य म्हणजे भाजपने येथे उमेदवारच उभा केला नाही आणि तांबे हे शेवटपर्यंत ‘मी काँग्रेसवालाच’ असे सांगत राहिले. तरीही नवख्या शुभांगी पाटील यांनी सत्यजीत तांबे यांना चांगलीच टक्कर दिली. येथे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, भाजपच्या उधार-उसनवारीच्या राजकारणाची, असही ठाकरे गटानं नमूद केलं.

कोकण शिक्षक मतदारसंघात त्यांच्याकडे स्वतःचा उमेदवार नव्हता. तिथे उधारीवर निवडणूक लढवली आणि नाशिक पदवीधर मतदारसंघातही भाजपला स्वतःचा उमेदवार मिळाला नाही. दुसऱ्यावर दरोडे टाकूनच त्यांचे राजकारण सुरू असते. मराठवाडा शिक्षक मतदारसंघातही भाजपने किरण पाटील हा उमेदवार आयत्या वेळेस उधारीवरच घेतला. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे हे येथे चौथ्यांदा विजयी झाले. अशा तऱ्हेने मराठवाड्यातील शिक्षक-पदवीधरांनी भाजपला नाकारले आहे. भाजपचा सगळ्यात मोठा पचका झाला आहे तो विदर्भात. नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ हे भाजपचे बालेकिल्लेच होते. या दोन्ही मतदारसंघांत भाजप उमेदवारांचा पराभव झाला हे महत्त्वाचे, असही शिवसेनेने म्हटलं आहे.

विदर्भातील सुशिक्षित मतदार भाजपच्या थापेबाजीच्या भूलभुलैयास बळी पडले नाहीत, अमरावती मतदारसंघात भाजपचे रणजित पाटील हे सतत दोन वेळा निवडून आले. फडणवीस यांचे ते खासमखास व मागच्या फडणवीस मंत्रिमंडळात ते मंत्री होते. पाटलांना विजयाची 1000 टक्के ‘गॅरंटी’ होती. पण अमरावतीच्या पदवीधरांनी त्यांना घाम फोडला व शेवटी घरीच बसवले. काँग्रेसच्या धीरज लिंगाडे यांना विजयी केले. हा व्यक्तिशः श्री. फडणवीस यांना धक्का असल्याचं सामनातून म्हटलं आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत विद्यमान आमदार गाणार यांचा पराभव महाविकास आघाडीच्या सुधाकर अडबाले यांनी केला. याचा अर्थ विदर्भातील सुशिक्षित मतदार आता शहाणा झाला असून भाजपच्या थापेबाजीच्या भूलभुलैयास बळी पडले नाहीत. याआधी नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव करून काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी झालेच आहेत. आता शिक्षक मतदारसंघही हातचा गेला, असही शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात म्हटलं आहे.


भारतात पहिल्यांदाच ‘तो’ होणार ‘आई’, ट्रान्सजेंडर कपलने शेअर केले फोटो