घरमहाराष्ट्र'भोकं पडलेला फुगा', शिवसेनेचा नारायण राणेंवर हल्लाबोल

‘भोकं पडलेला फुगा’, शिवसेनेचा नारायण राणेंवर हल्लाबोल

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली. काल रात्री त्यांना महाड न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्यांनी सशर्त जामीन मंजूर केला. दरम्यान शिवसेना आणि राणे वाद संपला असं दिसत नाही आहे. याचं कारण म्हणजे आज शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भोकं पडलेला फुगा, असा टोला शिवसेनेने राणे यांना लगावला.

मोदींच्या मांडीस मांडी लावून बसणाऱ्या ‘महात्मा’ नारोबा राणेंनी…

“पंतप्रधान मोदी यांच्या मांडीस मांडी लावून बसणाऱ्या ‘महात्मा’ नारोबा राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची भाषा केली. पंतप्रधानांच्या बाबतीत कुणी असे विधान केले असते तर त्यास देशद्रोहाच्या आरोपाखाली एव्हाना तुरुंगात डांबलेच असते. नारोबा राणे यांचा गुन्हा त्याच पद्धतीचा आहे. महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे व एका मर्यादेपलीकडे ही बेताल बादशाही खपवून घेतली जाणार नाही हे कृतीने दाखवून द्यायची हीच वेळ आहे. पंतप्रधान मोदी हा बेतालपणा सहन करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांवर हात टाकण्याची भाषा करणारा कोणीही असो त्यांचे हात सध्या तरी कायदेशीर मार्गाने उखडलेलेच बरे! पंतप्रधान मोदींना मारण्याचा नुसता कट रचल्याच्या (?) आरोपाखाली काही विचारवंतांना फडणवीस सरकारने तुरुंगात सडवलेच आहे. इथे नारोबा राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचीच सुपारी घेतल्याचे दिसत आहे. आता सुपारीबाजांची महाराष्ट्रात आरती ओवाळायची काय?” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

- Advertisement -

राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते

“नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. ही सर्व शिवसेना या चार अक्षरांची कमाई. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा दणकून पराभव शिवसेनेने केला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरून फुगवला तरी वर जाणार नाही,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

मग ते ऍबनॉर्मल आहेत काय ते तपासावे लागेल

“भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखविण्याचे ठरवले आहे. राणे यांना काही लोक ‘डराव डराव’ करणाऱ्या बेडकाचीही उपमा देतात. राणे हे बेडुक असतील किंवा भोकवाला फुगा, पण राणे कोण? हे त्यांनी स्वतःच जाहीर केले, ”मी ‘नॉर्मल’ माणूस नाही,” असे त्यांनी जाहीर केले. मग ते ऍबनॉर्मल आहेत काय ते तपासावे लागेल,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

- Advertisement -

राणे हे एखाद्या छपरी गँगस्टरसारखेच वागतायत

मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये राणे हे अती सूक्ष्म खात्याचे लघु उद्योगमंत्री आहेत. पंतप्रधान स्वतःला अत्यंत ‘नॉर्मल’ माणूस म्हणवून घेतात. ते स्वतःला फकीर किंवा प्रधानसेवक म्हणवून घेतात, हा त्यांचा विनम्र भाव आहे, पण राणे म्हणतात, ‘मी नॉर्मल नाही. त्यामुळे कोणताही गुन्हा केला तरी मी कायद्याच्या वर आहे.’ राणे व संस्कार यांचा संबंध कधीच नव्हता. त्यामुळे केंद्रीय मंत्रीपदाची झूल अंगावर चढवूनही राणे हे एखाद्या छपरी गँगस्टरसारखेच वागत-बोलत आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -