घरमहाराष्ट्रराठोड प्रकरणी उद्धव ठाकरेंची अग्निपरीक्षा, शिवसेना नेत्यांची वर्षावर बैठक सुरु

राठोड प्रकरणी उद्धव ठाकरेंची अग्निपरीक्षा, शिवसेना नेत्यांची वर्षावर बैठक सुरु

Subscribe

संजय राठोडांचा घेणार राजीनामा?, तिन्ही पक्षांच्या आमदारांसाठी डिनर डिप्लोमसी

वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधी पक्षाकडून राजीनाम्यासाठी वाढत चाललेला दबाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्री, आमदार, जिल्हा प्रमुख आणि प्रमुख नेत्यांची बैठक वर्षा निवासस्थानी बोलावली आहे. बैठकीला वनमंत्री संजय राठोड गैरहजर असून आज संध्याकळपर्यंत राठोड यांच्या राजीनाम्याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे शिवसेनेच्या गोठातून सांगितले जात आहे. दरम्यान विधानपरिषेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला संजय राठोड यांचा राजीनामा राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे कधी पाठवणार अशी विचारणा करणारे ट्विट केल्याने शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. दरम्यान पोलिस महासंचालक हेमंत नगराळे हे पुणे येथे पोहोचले असून पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून मुळची बीडची असलेल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची माहिती घेतल्याचे समजते. लवकरच हा अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला जाणार आहे.

येत्या १ मार्चपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा धुरळा उडाला आहे. या घटनेचा आधार घेत महाविकास आघाडीच्या सरकारला कॉर्नर करण्याची संधी भाजप घेण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे. पूजा आत्महत्या प्रकरणात भाजपने वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. या घटनेसह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे अध्यक्ष पदाच्या नव्या निवडीत दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेत सेनेने डिनर डिप्लोमसीचा आधार घेतला आहे. ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सामोरे जावे लागणार आहे. भाजपकडून पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत आहेत. हे आरोप अर्थातच सेनेवर होत असल्याने सध्या शिवसेना महाविकास आघाडीत बॅकफुटला आली आहे. शिवसेनेवरील वाढता दबाव पाहता वनमंत्री संजय राठोड यांचा सेनेकडून राजीनामा घेतला जाण्याचे संकेत मिळत आहेत.

- Advertisement -

संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठीच शिवसेनेवर दबाव वाढत आहे. त्यामुळेच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेवर वाढता दबाव येऊ लागल्याने राठोड यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाप्रत शिवसेना आल्याचे कळते. संजय राठोड हेदेखील अज्ञातवासात गेले असून शिवसेनेतल्या एका गटातून त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळावे असेही त्यांना सांगण्यात आले आहे. दुसरीकडे संजय राठोड हे गुरुवारी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राठोड यांच्या प्रकरणाबरोबरच नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर दगाफटका नको म्हणून सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांसाठी डिनर डिप्लोमसी वापरली जात आहे.

पूजा चव्हाण आत्महत्येच्या निमित्ताने संजय राठोड यांच्याविरोधात भाजपने अतिशय आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपच्या महिला आघाडीकडून तसेच भाजप नेत्यांनी संपूर्ण प्रकरणात अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. एक मार्चपासून मुंबईत सुरू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राठोड प्रकरणात विरोधकांकडून मोठा गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे. यामुळेच शिवसेनेकडून या प्रकरणात लवकरच काहीतरी मोठा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडीच्या सरकारवर यानिमित्ताने आरोप होत असल्याने शिवसेनेवरीलही दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे राठोडप्रकरणाची अडचण असताना दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आपला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने या पदासाठी होणार्‍या निवडणुकीत दगाफटका बसू नये, यासाठी तिन्ही पक्षांच्या आमदारांची एकत्रित बैठक बोलावली आहे.

- Advertisement -

याआधीच राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही एका महिलेने आरोप केले होते. पण भाजपचे आणि मनसेच्या नेत्यांनी या महिलेच्या आरोपात तथ्य नसल्याचे समोर येऊन सांगितल्यावर या प्रकरणात कलाटणी मिळाली होती. खुद्द तक्रारदार रेणू शर्मा या महिलेनेही आपले सगळ्या तक्रारी मागे घेतल्या होत्या. आता पूजा चव्हाण प्रकरणाच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनीही ती आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले आहे.

याआधीच शिवसेना भाजप युती काळातही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी युतीतल्या काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामध्ये सुरेशदादा जैन, महादेव शिवणकर, शोभाताई फडणवीस, नवाब मलिक यांच्यावर आरोप झाले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका घेत जोवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तोवर मंत्रीपदाचा राजीनामा द्या, असे स्पष्ट केले होते. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये २०१२ मध्ये अजितदादा पवार यांच्यावर सिंचन घोटाळा प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनीही आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी एक श्वेतपत्रिका काढत सिंचन घोटाळा प्रकरणात अजितदादा यांना क्लीन चिट दिली होती.

महाविकास आघाडीची डिनर डिप्लोमसी
महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक मंगळवारी लावण्यात आली आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने ही बैठक महत्वाची मानली जात आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीसमोर पेचप्रसंग उभा राहिला आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लागणार का या विचारानेच महाविकास आघाडीच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळेच ही आमदारांची डिनर डिप्लोमसी महत्वाची मानली जात आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -