विशेष भाग ४ : अविवाहित दिर, नणंदमुळे ४४ टक्के घटस्फोट

घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणासंदर्भात आपली काही मते असल्यास ती ९०२२५५७३२६ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवावीत.

नाशिक : एकीकडे घटस्फोटांच्या मुख्य काही कारणांमध्ये मुलीच्या आईचा मुलीच्या संसारात असलेला अतिरेकी हस्तक्षेप याचा समावेश होत असताना आणखी एक धक्कादायक वास्तव एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. आकाराने लहान कुटुंब विभक्त होण्याचे प्रमाण तब्बल ८७ टक्के तर, संयुक्त कुटुंबात विभक्त होण्याचे प्रमाण १३ टक्के आहे. विशेष म्हणजे घरात अविवाहित भाऊ-बहीण असल्यास त्यांच्यामुळे भांडण होऊन विभक्त होण्याचे प्रमाण अनुक्रमे ४४.२ आणि ४३.३ टक्के असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

संयुक्त कुटुंबपद्धतीत घटस्फोटांचे प्रमाण कमी आहे असे सर्रासपणे सांगितले जरी जात असले तरी त्याची दुसरी बाजूदेखील समोर आली आहे. अर्थात कोणतेही नातेसंबंध कुटुंबाला बांधून ठेवण्याचेच काम करणारे हवे. त्यातून कुटुंबात विसंवाद होत असेल तर त्या नातेसंबंधांना अर्थ उरत नाही. कुटुंबातील सदस्यांसोबतचा सलोखा कायम ठेवत सुसंवाद साधल्यास त्यातून विभक्त होण्याचे प्रमाण निश्चितपणे कमी होऊ शकते. संयुक्त कुटुंबातील दांपत्यांची भांडणे झाल्यास मध्यस्थी करण्याची जबाबदारी कुटुंबातील मोठी माणसे बखुबी निभावतात. परंतु, छोट्या कुटुंबात, विशेषत: विभक्त कुटुंबात नवरा-बायकोचे भांडण झाल्यास त्यांची समजूत घालण्यासाठी कुणी नसतेच. त्यातून टोकाचा निर्णय घेण्यापर्यंत वेळ येऊ शकते.
नागपूर येथील कुटुंब न्यायालयात समुपदेशक असलेल्या संगीता साठवणे-पांडे यांनी ‘आधुनिक जीवनशैलीमुळे नवदाम्पत्यांमध्ये वाढलेली विभक्त होण्याची प्रवृत्ती व त्याचा सामाजिक जीवनावर होणारा परिणाम तसेच न्यायप्रविष्ट केलेल्या नवविवाहित दाम्पत्यांचे ‘अध्ययन’ विषयावरील संशोधन पूर्ण केले आहे. त्यामध्ये त्यांनी १९९६ ते २०१२ दरम्यान कुटुंब न्यायालयात विभक्तीकरणासाठी नोंद झालेल्या दाव्यांचा अभ्यास केला. त्यामध्ये विभक्त होण्यामागे विविध आश्चर्यकारक कारणे असल्याचे दिसून आली आहेत. अध्ययनानुसार, आकाराने लहान कुटुंबात विभक्तीकरणाची टक्केवारी ८७ तर संयुक्त कुटुंबात १३ टक्के आहे.

सर्वेक्षणातील निष्कर्ष
  • ९.७ टक्के : एक वा दोन अपत्य असणार्‍यांत विभक्तीचे प्रमाण
  • ८७ टक्के : अपत्यहीन दाम्पत्यांचे घटस्फोटांचे प्रमाण
  • ४१.८ टक्के : विवाह हे पवित्र बंधन मानणार्‍यांची संख्या
  • २७.५ टक्के : विवाहाला सामाजिक-भावनिक बंधन मानणारे
  • ६८.४ टक्के : लग्न झाल्यावर वर्षभरातच भांडण होणार्‍यांचे प्रमाण
  • ५४.३० टक्के : वर्षभरानंतर वाद घालणार्‍यांचे प्रमाण

नवीन पिढीमध्ये सहनशक्तीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातून पती-पत्नीमध्ये वाद होत आहेत. किरकोळ कारणावरुन पती-पत्नी घटस्फोटाचा निर्णय घेत आहेत. भावजयीने आई-वडिलांचा चांगला संभाळ केला पाहिजे, असे सुनेला वाटत असते पण ती सासू-सासर्‍यांना संभाळ करत नाही. त्यांचे ऐकून घेत नाही. आरे ला का रे लगेच करते. नातेवाईकांनी सणासुदीच्या कार्यक्रमांना घरी येऊ नये, अशी भूमिका तिची असते. ती पतीला त्याच्या आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास भाग पाडते. त्यातून वाद वाढतो. तडजोड कोणीच करत नसल्याने हे प्रकरण घटस्फोटांपर्यंत जाते. सुसंवाद, तडजोड केल्यास ९० टक्के वाद कमी होतील. : अ‍ॅड. राहुल देशमुख, वकील

एकत्र कुटुंब पद्धतीचा र्‍हास झाल्यामुळे आणि पाश्चात जीवनपद्धतीचे अनुकरण नवीन पिढी करू लागली आहे. परिणामी, एकत्रिक कुटुंब पद्धतीचा र्‍हास होत असून, विभक्त कुटुंबांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कौटुंबिक संवादाचा अभाव आणि पालकांच्या स्वार्थी संस्कारामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. घटस्फोटांचे प्रमाण कमी करण्यासाठी एकत्रित कुटुंबपद्धतीवर भर देणे, पालकांचा स्वार्थी संस्कार व हस्तक्षेप कमी करण्यावर आणि पाश्चात संस्कृतीचे अनुकरण टाळणे, यावर लक्ष केंद्रित करणे आणि तसे कुटुंबातूनच समुपदेशन व कौटुंबिक संवाद झाले तर नक्कीच घटस्फोटांचे प्रमाण समाजातून कमी होईल. : अ‍ॅड. अलका शेळके-मोरेपाटील, वकील

संयुक्त कुटुंब पद्धतीत मोठ्यांचे सातत्याने मिळणारे मार्गदर्शन आणि नवरा- बायकोत भांडण झाल्यास ते सोडवण्याची मनवृत्ती यामुळे घटस्फोटांचे प्रमाण कमीच असते. विभक्त कुटुंबात मात्र भांडणे सोडवणारे कुणीही नसतात. शिवाय संसारात काही अडचणी आल्यास त्यातून बाहेर कसे पडावे हे सांगण्यासाठी अनुभवी लोकही नसतात. त्यातून घटस्फोटासारखे टोकाचे निर्णय घेतले जातात. संसार हा दोघांचा असला तरी तो फुलतो कुटुंबातील सदस्यांमुळे. कुटुंबातील सदस्यांनी घरातील दांपत्यांचा संसार टिकवून ठेवण्यासाठी विसंवादाला तिलांजली देऊन सुसंवाद कायम ठेवल्यास त्यातून विभक्तीकरणासारखा मोठा निर्णय टाळता येऊ शकतो. : अ‍ॅड. किरण देशमुख, सेक्रेटरी, येवला वकील संघ