घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रविशेष : मुलींच्या संसारात आईचा हस्तक्षेप धोकादायक

विशेष : मुलींच्या संसारात आईचा हस्तक्षेप धोकादायक

Subscribe

नाशिक : वाढत्या घटस्फोटांमुळे कुटुंबसंस्थेला घरघर लागली असून, अनेक घटस्फोटांना मुलीची आई कारणीभूत असल्याचे कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या घटस्फोटांच्या आकडेवारी आणि कौटुंबिक समुपदेशकांच्या निदर्शनास आले आहे. सासरी जर मनासारख्या काही गोष्टी झाल्या नाहीतर मुलीची आई ‘मार्गदर्शन’ करते. मुलीवरील प्रेमापोटीच तिला सल्ले दिले जात असले तरी त्यातून गैरसमज होऊन पती-पत्नीमध्ये टोकाचे वाद निर्माण होत आहेत.

मुलीचा संसार सोन्यासारखा असावा. तिच्या प्रगतीत कोणतेही अडथळे येऊ नये, तिच्या पतीने तिला राणीसारखी वागणूक द्यावी, अशी प्रत्येक माता- पित्याची रास्त अपेक्षा असते. ही अपेक्षा पूर्ण व्हावी यासाठी ते तशा स्वरुपाच्याच जावयाचा शोध घेत असतात. मनासारखा जावई मिळो अथवा न मिळो पण लग्नानंतर मुलीचे आपल्या माहेरशी चांगला संपर्क असतो. या संपर्कामुळे मुलीचा मानसिक स्वास्थ्य अबाधित राहते ही वस्तुस्थिती आहे. लग्नानंतर नवीन घर, नवीन माणसं, नवीन चालीरितीची सवय होईपर्यंत मनमोकळे करण्यासाठी मुली आईशी बोलतात. परंतु अलिकडे पालकांचा विशेषत: मातेचा मुलीच्या संसारात हस्तक्षेपाचा अतिरेक होत असल्याने त्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात.

- Advertisement -

मुलीच्या मुठीत जावई असावा आणि सुनेने मात्र मुलाचे ऐकले पाहिजे, अशी संस्कृतीही बळावतांना दिसत आहे. आई मुलीच्या भल्यासाठीच तिला सल्ले देत असली तरी त्यातून गैरसमजही निर्माण होऊ शकतात, याची तिला कल्पनाच नसते. त्यातून पुढे पती-पत्नीतील भांडणे वाढतात.(क्रमश:)

पत्नी-पतीच्या नात्यामध्ये दोघांची आई गैरसमज निर्माण करतेे, हे खरे आहे. मुलाच्या आईला सून घरात आल्याने असुरक्षित वाटत असते. सासू सुनेला घरातील साहित्यांबाबत माहिती देते, पण ही बाब सुनेला आवडत नाही. मुलीच्या आईसुद्धा नवर्‍याच्या घरात स्वत:चे कसे अस्तित्व निर्माण करावे, याबाबत मुलीस काही गोष्टी सांगत असते. त्यातून मुलीला आई जे सांगेन तेच खरे वाटते. परिणामी, पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होतात. पती-पत्नीमध्ये सुसंवाद असला पाहिजे. पत्नीने कधीही सासरी नांदताना आईचे ऐकू नये. कारण ती १८ वर्षे पूर्ण झाल्याने स्वत:चे निर्णय घेण्यास सक्षम असते. सासरी नांदायला गेल्याने सुनेने सासूशी संवाद ठेवला पाहिजे. : प्रतिभा बुरकुले, वकील

वाढते घटस्फोटांचे प्रमाण चिंताजनक आहे. विवाह संस्था एकमेकांच्या विश्वास व तडजोडीवर असते. मुलीच्या संसारात आईचा हस्तक्षेप चुकीचा आहे. अनावश्यक सल्ले दिले जात असल्याने घटस्फोट होत आहेत. लग्न झाल्यानंतर सणासुदीला मुलीला बोलवणे ठीक आहे पण दररोज मुलीच्या आईने कॉल करुन सल्ले देणे चुकीचे आहे. घटस्फोट एका कुटुंबाचा असला तरी त्याचा परिणाम समाजजीवनावर होतो. ही एक सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे. प्रत्येकाने एकमेकांची जबाबदारी ओळखल्यास घटस्फोटांचे प्रमाण कमी होईल. : अभिजित बगदे, वकील

पती-पत्नी घटस्फोटापर्यंत जाण्यामागील अनेक कारणे समुपदेशकांना आढळून आली आहेत. घटस्फोटास पती-पत्नी आणि दोघांकडील आई-वडील जबाबदार आहेत. नात्यांमध्ये सुसंवाद राहण्यासाठी स्वतःला कोणत्या ना कोणत्या चांगल्या कामात गुंतवून ठेवणे, एकमेकांवर प्रेम व विश्वास ठेवणे, ज्येष्ठांचा आदर बाळगणे, छंद जोपासने, वाचन असे अनेक सकारात्मक उपाय जोपासल्यास कोणत्याच जोडप्यास घटस्फोटापर्यंत जाण्याची गरज पडणार नाही. : अ‍ॅड.समीर शिंदे, कौटुंबिक समुपदेशक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -