राजू शेट्टी लागले लोकसभेच्या तयारीला, ‘या’ ६ मतदारसंघातून स्वाभिमानी लढवणार निवडणूक

यावेळी राजू शेट्टी यांनी एक कविता सादर करून संपात सहभागी सरकारी कर्मचाऱ्यांना सवाल उपस्थित केले.

Swabhimani Shetkar Sangathana

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वासर्वे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुढील वर्षा होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकींसाठी दंड ठोपाटले असून ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसंबंधी त्यांनी मोठी घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. राज्यातील एकूण सहा जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढविणार असल्याचं राजू शेट्टी यांनी जाहीर केलंय.

गेल्या काही दिवसांपासून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आक्रमक भूमिका घेत आहेत. नुकतेच ते महायुतीतून बाहेर पडले आहेत. पुढील निवडणूकांच्या रणनितीवर चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अभ्यास शिबीर पार पडले. या शिबीरात लोकसभेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. हातकणंगले, सांगली, माढा, कोल्हापूर, बुलढाणा, परभणी अशा सहा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढविणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. याबाबत राज्यकार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असंही यावेळी राजू शेट्टींनी सांगितलं.

यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजू शेट्टी म्हणाले की, “आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आहेत. भाजपमधून या अगोदरच बाजूला झालो आहोत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष चालू आहे. रस्त्यावरची लढाई आमची संपलेली नाही. केंद्र व राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही, असे ठणकावून सांगणे गरजेचे आहे. मी मांडलेला हमीभावाचा कायदा अजून तो प्रलंबित आहे. केंद्र जोपर्यंत हमीभावाचा कायदा करत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. शेतकर्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यावर कोणत्याच सभागृहात चर्चा केली जात नाही. त्यासाठी शेतकरी प्रश्नावर बोलणारे लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून जाणे गरजेचे आहे.”

यावेळी राजू शेट्टी यांनी एक कविता सादर करून संपात सहभागी सरकारी कर्मचाऱ्यांना सवाल उपस्थित केले. “आज गारपीट झाली अवकाळी झाला, आता माणुसकी पुढं तुम्हाला संप मोठा झाला का? असा प्रश्व यावेळी राजू शेट्टींनी उपस्थित केला. तसंच पंचनाम्या अभावी आमच्या संसाराचा आता वरवंटा होऊ दे का? अशा शब्दात राजू शेट्टी यांनी आपला संताप व्यक्त केला. तसंच कांद्याचे दर, दूध आंदोलन, रास्ता रोको अशा आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी इतरांना त्रास दिला नसल्याची ही आठवण करून दिली.

या अभ्यास शिबीराप्रसंगी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, अजित, संदीप राजोबा, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.