घरआतल्या बातम्याExclusive : सुटीच्या दिवशी स्वच्छता अभियान; BMC अधिकारी, कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर

Exclusive : सुटीच्या दिवशी स्वच्छता अभियान; BMC अधिकारी, कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर

Subscribe

मुंबई – मुंबई सुंदर, स्वच्छ, प्रदूषण व खड्डे मुक्त रस्ते अशी असावी, याबाबत काहीच दुमत नाही. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली स्वछता मोहीम आणि त्यामागील त्यांचा उद्देशही चांगलाचआहे. मात्र शनिवार, रविवार, सणांनिमित्ताने मिळणाऱ्या हक्काच्या सुट्ट्यांच्या दिवशी स्वछता मोहीमेत अधिकारी व कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी यांना सहभागी व्हायला लावणे चुकीचे आहे, असा काहीसा नकारत्मक सूर संबंधित, अधिकारी, कर्मचारी वर्गातून ऐकायला मिळत आहे.

कामगार नेत्यांनीही आठवड्यातून एकदा मिळणाऱ्या हक्काची सुट्टीच्या दिवशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत एन्जॉय करू द्यावी. आपला प्रसिद्धीचा हव्यास पुरविण्यासाठी व शायनिंगसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी अगोदर पालिकेतील 60 हजार रिक्त पदे भरावीत. हवे तर कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, मात्र पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या साप्ताहिक व सणासुदीच्या हक्काच्या सुट्टीवर गंडांतर आणू नये, अशा तिखट व झणझणीत प्रतिक्रिया मुंबई महापालिकेत अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनाप्रणित (ठाकरे गट) (Shivsena UBT) कामगार संघटनेचे नेते बाबा कदम आणि रमाकांत बने यांनी व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

मुंबई स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या संकल्पनेतून मुंबईत रविवार 3 डिसेंबर 2023 पासून स्वछता मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने पुढे दर आठवड्याच्‍या शनिवारी प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) राबविण्‍यास प्रारंभ केला.
त्यानंतर, मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने 9 डिसेंबर 2023 रोजी महापालिकेच्या पाच विभागात सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत विशेष स्‍वच्‍छता मोहीम राबविण्यात आली.
तसेच, रविवार 17 डिसेंबर 2023 रोजी चार परिमंडळात प्रत्येकी एक विभाग (वॉर्ड), याप्रमाणे चार विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वछता मोहीम राबविण्यात आली.

स्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र आहे. याच भावनेने मुंबई महापालिकेने संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम अर्थात डीप क्लिनिंग ड्राइव्ह सुरु केली आहे. त्याद्वारे मुंबई स्वच्छ, सुंदर आणि निरोगी होत आहे. मुंबई महापालिकेचा स्‍वच्‍छता पॅटर्न यशस्‍वी होत असून हा पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये राबविला जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी 24 डिसेंबर 2023 रोजी पालिकेच्या तीन विभागात स्वछता अभियान राबविताना केली.
तसेच, मुंबई महानगरात सुरु झालेली संपूर्ण स्वच्छता मोहीम ही लोकचळवळीत रुपांतरीत होत आहे, असे सांगत महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने रविवारी 31 डिसेंबर 2023 रोजी ‘महा स्वच्छता अभियान’ अर्थात ‘मेगा डीप क्लिनिंग ड्राइव्ह’ च्या रुपात स्वछता उपक्रम मुंबईत 10 ठिकाणी राबविले.
तात्पर्य हेच की, मुख्यमंत्री शिंदे आणि पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशानेच महापालिकेने 3 डिसेंबरपासून ते 31 डिसेंबरपर्यन्त दर शनिवारी, रविवारी म्हणजे साप्ताहिक सुट्टीच्या आणि सणांच्या दिवशी अगदी ‘थर्टी फर्स्ट’ रोजीही स्वच्छता अभियान राबविले गेले.

- Advertisement -
शनिवार, रविवार, सणांनिमित्ताने मिळणाऱ्या हक्काच्या सुट्ट्यांच्या दिवशी स्वछता मोहीमेत अधिकारी व कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी यांना सहभागी व्हायला लावणे चुकीचे असल्याचा सूर उमटू लागला आहे

अधिकारी, कर्मचारी वर्ग नाराज 

मुख्यमंत्री शिंदे व पालिका आयुक्त चहल यांचे आदेश असल्याने पालिकेचे संबंधित खाते प्रमुख अधिकारी म्हणून नाईलाजाने स्वछता मोहिमेला नियोजित ठिकाणी काही तास अगोदरच कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहणे भाग असते. स्वच्छता मोहिम सकाळी 7 पासून दुपारी 2 पर्यंत पाच-सहा तासांची असते. मात्र अधिकारी वर्गाला चार दिवस अगोदरपासूनच त्याची पूर्वतयारी करावी लागते. शनिवार, रविवारी हक्काची सुट्टी असली तरी त्या दिवशी कामासाठी यावेच लागते. कुटुंबाला, मुले, पत्नी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना अपेक्षित वेळ देता येत नाही. एखाद-दोन वेळा ठीक आहे पण दर आठवड्याला सुटीच्या दिवशी स्वच्छता मोहिमेत नाईलाजाने भाग घ्यावा लागतो. कर्मचाऱ्यांही अशीच अवस्था आहे, अशी प्रतिक्रिया अधिकारी, कर्मचारी वर्गात ऐकायला मिळत आहे.

स्वच्छतेसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी काम देऊ नका :
मुंबई स्वछता अभियान यापूर्वी राबवले जात होते. मात्र त्यावेळी अधिकारी, कर्मचारी यांना स्वछतेसाठी सुट्टीच्या दिवशी कामावर येण्याबाबत सक्ती नसायची. मुंबई स्वच्छ व सुंदर असावी, यात काहीच दुमत नाही. पण त्यासाठी मनुष्यबळ पाहिजे. पालिकेत सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची अगोदर मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यवस्था करावी. हवे तर कंत्राटी कर्मचारीही जोडीला घ्यावेत. अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्या सोडवाव्यात. त्यांना आवश्यक सेवासुविधाही द्याव्यात. त्यानंतर खुशाल त्यांनी स्वछता अभियान राबवावे. त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसाठी सुट्टीच्या दिवशी काम देऊ नका. त्यांनाही त्यांच्या कुटुंबाला वेळ द्यायला पाहिजे, अशी तिखट व झणझणीत प्रतिक्रिया मुंबई महापालिकेत अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनाप्रणित (ठाकरे गट) कामगार संघटनेचे नेते बाबा कदम यांनी व्यक्त केली आहे.

हक्काच्या सुट्टीवर गंडांतर नको, ६० हजार रिक्त पदे भरा : 
मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या आदेशाने पालिका आयुक्त इकबाल चहल हे मुंबईत स्वछता अभियान राबवित आहेत. ही बाब चांगली आहे. त्यामागील उद्देशही चांगला आहे ; मात्र त्यासाठी पालिकेतील ६० हजार रिक्त पदे अगोदर भरण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि आयुक्त यांनी प्रशासनाला द्यावेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होईल. मग दिवसातून चार वेळा मुंबई स्वच्छ करा. मात्र हक्काच्या शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱयांनी त्यांच्या कुटुंबाला वेळ देणे आवश्यक असते. असे असताना त्यांना हक्काच्या सुट्टीच्या दिवशी कामाला बोलावून त्यांच्या हक्काच्या सुट्टीवर गंडांतर आणू नये. याबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त इकबाल चहल यांना पत्र देऊन त्यांच्याकडे तशी विनंतीवजा मागणी करणार आहोत.
रमाकांत बने, सरचिटणीस, दि म्युनिसिपल युनियन

हेही वाचा : Loksabha 2024: सिंधुदुर्ग-रत्नागिरीत महायुतीची उमेदवारी ‘यांना’; निवडणुकीनंतर Narayan Rane राज्यपाल पदी?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -