घरमहाराष्ट्रमुंबई महापालिकेवर आमचाच भगवा राहणार, शिवसेनेच्या ठाकरे गटाला विश्वास

मुंबई महापालिकेवर आमचाच भगवा राहणार, शिवसेनेच्या ठाकरे गटाला विश्वास

Subscribe

मुंबई : ‘मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार ते फक्त ईश्वरालाच ठाऊक,’ असे गमतीचे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी केले. पेच व कारस्थाने करणाऱ्यांना सोयीनुसार ईश्वर आठवतो हेच खरे! पण ईश्वराचे नाव घ्या नाही तर आणखी कोणाचे, मुंबई महानगरपालिकेवरचा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा उतरविणे कोणाच्या बापास जमणार नाही, असा ठाम विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. गेली सुमारे 25 वर्षे शिवसेनेची (ठाकरे गट) सत्ता असलेली मुंबई महापालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. भाजपा मुंबईचे अध्यक्षपद आशीष शेलार यांच्याकडे सोपविण्यात आले. 2017ची मुंबई महापालिका निवडणूक भाजपाने शेलार यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. भाजपने स्वबळावर 82 जागा जिंकून शिवसेनेचे वर्चस्व मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. भाजपा आणि शिवसेनेमध्ये फक्त दोन जागांचे अंतर होते. शेलार यांच्या नियुक्तीनंतर गणेशोत्सवात भाजपाचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते. तेव्हा त्यांनी मुंबई महापालिकेच्या दृष्टीने त्यांनी 150 जागांचे लक्ष्य भाजपासाठी जाहीर केले. त्यामुळे येणारी महापालिका निवडणूक अटीतटीची होणार आहे, हे निश्चित. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात मुंबई मनपावर भगवा कायम राहील, हा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

अंधेरी पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का कमी होता. पण भाजप किंवा लाचार मिंधे गटाचा उमेदवार असता तर जनता अधिक जोमाने व त्वेषाने मतदान केंद्रावर पोहोचली असती. मतदानाचा आकडा 60 टक्क्यांवर गेला असता व मिंध्यांच्या बुडास मशालीचे चटके बसले असते. अर्थात उद्याच्या मुंबई, ठाणे, महानगरपालिकेत जनतेचा कौल कोठे आहे, त्याची ही नांदी असल्याचे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेण्याचे पाप सध्याच्या कंस मामांनी केले. ईश्वराने नव्हे! ईश्वराचे वरदान शिवसेनेस (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लाभले आहे. त्यामुळे हाती मशाल घेऊन शिवसेना तुमच्या छाताडावर पाय देऊन उभीच राहील. मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच राहील व कोणत्याही वेळी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची घोषणा होईल, अशा हालचाली राजकीय भूगर्भात सुरू आहेत याची मिंधे गटास कल्पना नाही. आम्ही मात्र कोणत्याही मैदानात उतरून आव्हानांचे घाव परतवून लावण्यास तयार आहोत. अंधेरीच्या पोटनिवडणुकीचा निकाल तेच सांगत आहे, असेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने म्हटले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -