Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक स्थापत्य कलेचा वारसा जपलेली नाशिकची प्राचीन शिवमंदिरे, बघा इतिहास अन् महात्म्य

स्थापत्य कलेचा वारसा जपलेली नाशिकची प्राचीन शिवमंदिरे, बघा इतिहास अन् महात्म्य

Subscribe

नाशिक : जिल्ह्यामध्ये दुर्मिळ आणि प्राचीन शिवमंदिरांचा खजिना आहे. सिन्नर येथील पंचायतन प्रकारातील गोंदेश्वर मंदिर यादव काळातील आहे. गोंदेश्वराचे महत्त्व फक्त सिन्नर अथवा नाशिकपुरते मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या स्थापत्यशिल्प वैभवात या मंदिराने भर घातलेली आहे. नाशिकसह खान्देश, मराठवाड्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पिनाकेश्वर महादेव मंदिर नांदगाव तालुक्यातील जातेगावमध्ये आहे.

बागलाणची भूमी गडकोटांची खाण आहे. अनेक मंदिरे प्राचीन असून, त्यांची माहिती पुराणात सापडते. मंदिरे ही भूतकाळातील सत्ताकेंद्रे होती. त्यामुळे त्यांची काळजी प्रत्येक राजवटीत घेतली गेली. काही मंदिरे तर विशिष्ट जातीची अस्मिता बनली. प्रभू रामचंद्रांनी देवळा तालुक्यातील उमराणे येथील परसूल नदीच्या तिरावर वनवास काळात वालुकामय शिवलिंग तयार केले. त्यालाच श्री क्षेत्र रामेश्वर म्हणून ओळखले जाते. येवल्यातील नागेश्वर महादेव नवसाला पावणारा असल्याची श्रद्धा आहे. श्रावणी सोमवारनिमित्त (दि.११) नाशिक जिल्ह्यातील निवडक शिव मंदिरांची माहिती.

पेशवेकालीन निलकंठेश्वर मंदिर

- Advertisement -

नाशिक शहर हे मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते. गोदेकाठी अनेक प्राचीन मंदिर असून त्यापैकी एक निलकंठेश्वर मंदिर, बालाजी मंदिराकडून राम कुंडाकडे जाताना गोरेराम मंदिराजवळ हे मंदिर स्थित आहे. संपूर्ण दगडात बांधलेले हे पेशवेकालीन मंदिर अगदी गोदावरीच्या किनारी पूर्वाभिमुख आहे , मंदिर स्थापत्यात हेमाडपंथी व वेसरशैलीचा प्रभावी वापर झालेला दिसतो. मंदिरास मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह असून मंदिर मुखमंडपात नंदी आहे. या मंदिराचे बांधकाम १७४७ मध्ये सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांचे बंधू लक्ष्मणशंकर यांनी केले. त्या काळात एक लक्ष रुपये खर्च करून मंदिर बांधले.

यादव काळातील सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर

बाणासूर राक्षसाने सिन्नर नगरी उचलून पालथी केली, अशी अख्यायिका सिन्नरबाबत सांगितली जाते. सिन्नरचा इतिहास जितका अनोखा आहे. तितकीच मंदिरेही देखणी आहेत. सुमारे आठशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. गोविंद राजाने सिन्नरच्या उत्तरेस बांधलेल्या मंदिरास पंचायत मंदिर म्हटले जाते. गणपती, पार्वती, सुर्यनारायण, विष्णू पिंड व नंदी चौरंगावरचे मंदिर आहे. मंदिरास दक्षिण, उत्तर, पूर्व असे तीन दरवाजे आहेत. हे मंदिर बारा ज्योतिलिंगमधील एक ज्योतिर्लिंग आहे. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर अन् पुढे गोंदेश्वर पडले असावे. हे मंदिर इ. स. ११६० साली बांधले असावे, असा अंदाज अभ्यासक लावतात. हे एकटे मंदिर नसून, शिवपंचायतन स्वरूपात असणारा हा पाच मंदिरांचा समूह आहे.

मराठ्यांच्या शौर्यचे प्रतिक असलेली नारोशंकर मंदिराची घंटा

- Advertisement -

भगवान शंकराला (भगवान शिव) समर्पित 18 व्या शतकातील नारोशंकर मंदिर हे गोदावरी नदीच्या काठावर पंचवटी येथे वसलेले एक सुंदर मंदिर आहे. हे 1747 मध्ये नारोशंकर राजेबहाद्दूर यांनी माया आर्किटेक्चर नावाच्या स्थापत्यकलेच्या अद्वितीय शैलीमध्ये बांधले होते. मुख्य मंदिर एका व्यासपीठावर बांधलेले आहे. या मंदिरावर एक घंटा असून, ती घंटा मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे. या मंदिराला पूर्वी रामेश्वर मंदिर म्हणून ओळखले जात होते. हे मंदिर बांधण्यासाठी राजस्थान व गुजरात येथून कुशल कारागीर आणण्यात आले. मंदिर ३७.७९ मीटर बाय २५.२९ मीटर आवारात बांधले गेले असून, त्याच्या चारही बाजूंनी ५.५ मीटर उंचीचा संरक्षक कोट बांधला आहे. गोदावरीच्या पुरातून संरक्षण होण्यासाठी हा कोट बांधला आहे. चारही कोपर्‍यात बुरुज आहेत. मंदिर उत्तर हिंदुस्थानी नागरशैलीत बांधलेले आहे. मंदिर भव्य व सुंदर असून, स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. मंदिराचे मुख्य शिखर २६ मीटर उंचीचे असून, त्यावर पौराणिक प्रसंग, हत्ती, सिंह प्राण्यांची शिल्पे कोरली आहेत. हे मंदिर फक्त हेमाडपंथी नसून नागरी पारंपारीक स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. या मंदिराचे सभामंडप हेमाडपंथी तर मंदिराभोवती असलेल्या छत्र्या राजपूत शैलीच्या आहेत. असे हे भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शैलीचा वैविध्यपूर्ण नमूना म्हणजे नारोशंकर मंदिर असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत त्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांविरुद्ध वसईच्या लढाईमध्ये मराठ्यांनी अभूतपूर्व पराक्रम केला. त्यावेळी वसईच्या किल्ल्यामधील चर्चच्या घंटा या लढाईचे स्मरण राहावे म्हणून पेशवे १७३९ सोबत घेऊन आले. त्यातील एक घंटा नाशिकमधील रामेश्वर मंदिरात ठेवण्याचे ठरवले. या घंटेच्या बाजूला असलेला महीरप हा देखील राजपूत शैलीचा आहे. तेव्हापासून या रामेश्वर मंदिराला नारोशंकर मंदिर आणि घंटेला नारोशंकर मंदिराची घंटा असे म्हणतात.

श्रीरामाने स्थापित केलेला नांदगावचा मोठा महादेव 

 नांदगाव तालुक्यातील जातेगांवच्या डोंगरावरील पिनाकेश्वर हे देवस्थान मोठा महादेव नावानेही ओळखले जाते. नाशिकसह खान्देश, मराठवाड्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान पिनाकेश्वर महादेव आहे. प्रभू रामचंद्र स्थापित व सदगुरु जनार्दन स्वामी जिर्णोद्धारीत हे देवस्थान आहे. या ऐतिहासिक पिनाकेश्वर महादेवाचा उल्लेख शिवपुराण व काशीखंड या ग्रंथात आढळतो. पुराणानूसार शिवाचे पिनाक व विष्णूचे सारंग हे महाविनाशक दिव्यधनुष्य समजले जातात. पिनाक हे शिवाने धारण केलेले धनुष्य असून शिवाचे पिनाक, पिनाकिन, पिनाकेय, पिनाकहस्ताय अशा विविध स्वरूपाची नावे प्रचलित आहेत. प्रभू रामचंद्रांनी वनवासकाळात शिवलिंग स्थापना करुन शिवआराधना केली. भगवान शिवाने प्रभू रामचंद्रांना पिनाक धनुष्य प्रदान केले. त्यामुळेच या तीर्थक्षेत्रास पिनाकेश्वर हे नाव प्राप्त झाले. शिवपार्वती सारीपाट खेळत असताना पार्वतीमातेने डाव जिंकला म्हणून महादेव रागावले आणि याच डोंगरावर येऊन ध्यानस्थ झाले. शिवविरहात दुःखी झालेल्या पार्वतीमातेने त्यांचा शोध घेण्यासाठी भिल्लीनीचा वेश धारण करून महादेवास वश केले.याच पवित्र स्थानी शिवशक्तीचे मिलन झाले तसेच शिवशक्तीचा पुनर्विवाह झाला.

श्रीराम संस्थानातील चांदोरीचे शिवलिंग

चांदोरीमध्ये राम मंदिराच्या आवारात एक प्राचीन शिवमंदिर आहे. इंद्र देवाने अहिल्येची छेडखानी केली असता त्यास गौतम ऋषींनी शाप दिला होता की तुला १००० भगे(भोके)पडतील. परंतु, इंद्र देवाने गौतम ॠषींकडे उपःशाप मागितला असता इंद्र देवास सोमेश्वराची प्रार्थना कर, असे सांगितले. इंद्र देवाने ज्या ठिकाणी सोमेश्वराची प्रार्थना केली ते हेच शिवमंदिर. पुढे रावणाचा मामा मारीच सुवर्णमृगाचे रुप घेवुन पंचवटीतून रामाला चांदोरीपर्यंत घेवुन आला. परंतु, रामाला जेव्हा हा मायावी राक्षस आहे हे कळले तेव्हा त्यास शिवमंदिरपासून हरणावर बाण मारला. तो बाण चाटोरी या गावा जवळ चाटून गेला म्हणून या गावास चाटोरी हे नाव पडले. तो राक्षस नांदुर मध्यमेश्वरजवळ मरण पावला. हे मंदिर काळाच्या ओघात नेस्तनाबूत झाले. राम मंदिर बांधल्यावर पुजार्‍यांना स्वप्न पडले. रामाच्या पाठीमागे आहे, तरी मला वरती काढावे. त्यावेळेस शिवलिंग मिळाले. श्रावणातील तिसर्‍या सोमवारी येथे सोमेश्वराचा मुखवटा ठेवला जातो.

सातपुड्याच्या शिखरावर चांदवडचे चंद्रेश्वर महादेव मंदिर

अहिल्यादेवी होळकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चांदवड गावाच्या उत्तरेला तांबकडा परिसरात एका डोंगरकड्यावर श्री चंद्रेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. त्या स्थानाचा महिमा असा आहे की, भोज राजा विक्रम याण्ची श्री शनिदेवांच्या वक्रदृष्टीतून मुक्तता झाल्यावर चांदवडचा राजा चंद्रसेन याने आपली मुलगी चंद्र्कलेचा विवाह राजा विक्रमाशी ह्याच गडावर लावून दिला व ५२ मंदिरांची स्थापना केली. पण मुगलांच्या हल्ल्यात हा परिसर नष्ट झाला व नंतर या परिसराला ग्रहण लागले. त्यानंतर चंद्रेश्वरचे पहिले महाराज श्री दयानंद स्वामी आलेत. त्यांना या जागेचा स्वप्नांत दृष्टांत आल्याचे म्हणतात. सद्यस्थितीत मंदिराचा तो भाग शेणामातीने भरलेला होता. दयानंद स्वामींनी तो स्वच्छ करून तेथे श्री शंभूची पुनर्स्थापना केली. आजही चंद्रेश्वरला मुख्य मंदिरासमोर स्वामी दयानंदांची समाधी व श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. या ठिकाणी भग्नावस्थेतला १७ व्या शतकातला चौघडा बघायला मिळतो. सध्या जयदेव पुरीजी महाराज मंदिराचा कारभार बघतात. मंदिराचे सर्वाधिकार ‘श्री संस्थान महामंडलेश्वर,हरिद्वार’ यांच्याकडे आहेत. चंद्रेश्वर मंदिर हे सुबकरीत्या कोरलेल्या कलात्मक मुर्त्यांमुळे आकर्षक दिसते. सभामंडपात कोरीव कामाचा उत्तम नमुना असणारा नंदी लक्ष वेधून घेतो. गाभार्‍यातील सुबक शिवलिंग मनोरम आहे. थोडे पुढे गेल्यावर ‘गणेश टाके’ आहे.

प्राचीन माहात्म्य असलेले इगतपुरीचे कावनई मंदिर

इगतपुरी तालुक्यातील कुंभमेळा सिंहस्थाचे मूलस्थान असलेल्या श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थावर श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. या तीर्थावरच संत ज्ञानेश्वरांनी मृत ब्राह्मणाच्या मुलाला पाणी पाजून जिवंत केले. समर्थ रामदासांनी येथेच शिवाजी महाराजांना उपदेश दिला. तसेच, तेथे गजानन महाराजांनी बारा वर्षें तपस्या केली व नंतर ते शेगावला गेले. घोटीपासून कावनईचे अंतर ८ किलोमीटर आहे. दर बारा वर्षांनी होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात कावनईच्या तीर्थ क्षेत्रापासून होते. या ठिकाणी भव्य राममंदिर असून, या तीर्थाला रामायणाचा वारसा लाभलेला आहे. कावनई हे तीर्थस्थान ११ लाख ३२ हजार वर्ष प्राचीन आहे. या तीर्थावर सर्व प्रथम कुंभमेळा भरत होता. येथे स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्या प्राप्त होते. या तीर्थावर सत्युगामध्ये भगवान कपिल आपल्या आईला सांख्य शास्त्राचे उपदेश देवून स्वर्गाला पाठविले. त्यामुळे हे तीर्थ मातृ गया झाले. कावनई क्षेत्राबाबत काही आख्यायिका प्रचलित आहेत. या तीर्थावर श्रीराम व भगवान शंकर यांची भेट झाली. या तीर्थाला साक्षात हनुमानाचे चरण लागलेले आहेत. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान या तीर्थावरुन जात असताना कालनेमी राक्षसाचा वध केला. त्यामुळे या गावाचे नाव कावनाई असे पडले.

- Advertisment -