१२ लाख ३७२ मतदारांच्या हाती महापालिकेचे भवितव्य

अंतीम मतदार याद्या प्रसिद्ध; ६२९६८२ पुरुष तर ५७०६३६ स्त्री मतदार; प्रभाग ८ मध्ये सर्वाधिक मतदार

नाशिक : नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. २१) ४४ प्रभागांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्यात. या याद्यांनुसार १२ लाख ३७२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या ६ लाख २९ हजार ६८२ इतकी आहे. तर स्त्री मतदारांची संख्या ५ लाख ७० हजार ६३६ इतकी आहे. तृतियपंथियांसह अन्य मतदारांची संख्या ५४ आहे. शहरातील एकमेवर चार सदस्यांच्या प्रभाग क्रमांक ८ मध्ये सर्वाधिक म्हणजे ३६ हजार ९८५ इतकी लोकसंख्या आहे. तर तीन सदस्यांच्या प्रभागांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या पंचवटीतील प्रभाग क्रमांक ५ मध्ये आहे.

प्रारुप मतदार यादी २३ जूनला प्रसिध्द करण्यात आली होती. प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर २३ जून ते ३ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार ३ जुलैपर्यंत ३ हजार ४९६ हरकती प्राप्त झाल्या होत्या. या हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन काही हरकती अंशत : मान्य, काही मान्य व काही अमान्य करण्यात आल्यात. अमान्य झालेल्या वगळून मान्य झालेल्या हरकती नुसार प्रारुप मतदार यादीत बदल करुन अंतिम मतदार यादया प्रसिध्द करण्यात आल्या असल्याची माहिती

येथे बघू शकाल अंतीम मतदार याद्या

अंतिम मतदार याद्या नागरिकांना पाहण्यासाठी विभागीय कार्यालय तसेच राजीव गांधी भवन मुख्यालयात ठेवण्यात आलेल्या आहेत. कार्यालयीन दिवशी व वेळेत या याद्या पाहता येतील.

एका पानाचे दीड रुपये

मतदार याद्यांची राजीव गांधी भवनातून विक्री होणार आहे. मतदार यादीची किंमत प्रति पृष्ठ (एक बाजूसाठी) १. ५० रुपये इतकी तर दोन्ही बाजूंसाठी ३ रुपये या प्रमाणे असेल. एकूण पृष्ठाची होणारी रक्कम सर्वसाधारण पावतीव्दारे भरणा केल्यानंतर, उपलब्ध असल्यास त्याच दिवशी, नसल्यास छपाई करुन दुसर्‍या दिवशी निवडणूक विभागामार्फत नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येतील. काही दिवसांकरीता नागरिकांच्या सोयीसाठी सर्वसाधारण पावतीचा भरणा करण्यासाठी निवडणूक विभागामध्ये कर विभागातील कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रभाग २० मध्ये ३८ तृतियपंथीय मतदार

जुने नाशिक परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक २० मध्ये ३८ तृतीयपंथीय मतदानाचा हक्क बजावू शकतील. याशिवाय प्रभाग २८ मधील ३, प्रभाग ७ मधील २ तर प्रभाग क्रमांक २, ३, ४, ८, १०, १८, १९, २२ आणि ४२ मधील प्रत्येकी एक तृतीयपंथीय मतदानाचा हक्क बजावू शकतील.