घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगुजरात विलीकरण आंदोलनाचा फियास्को

गुजरात विलीकरण आंदोलनाचा फियास्को

Subscribe

नाशिक : राज्यात कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पेटलेला असताना सुरगाणा तालुक्यातील काही ग्रामस्थांनी गुजरातमध्ये जाण्यासाठी स्थापन केलेल्या सीमावर्ती संघर्ष समितीत फूट पडली आहे. या समितीचे अध्यक्ष चिंतामण गावित यांनी पालकमंत्र्यांसमोरच आम्ही आंदोलनावर ठाम असल्याचे प्रथमत: सांगितले तर, याच सीमावर्ती भागातील 12 गावच्या सरपंचांनी त्यांच्या या भूमिकेला विरोध करत आम्ही महाराष्ट्रातच राहणार असल्याची भूमिका घेतली. पालकमंत्री दादा भुसे यांनीही आक्रमक पवित्रा घेत थेट राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्षांशी तुमचे बोलणे झाले आहे का? अशी विचारणा केल्यामुळे गावितांना नमती भूमिका घावी लागली. आपल्या आंदोलनाचा फियास्को झाल्याचे लक्षात येताच चिंतामण गावित यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद सुरु असतानाच ‘यू-टर्न’ घेत आम्ही आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.

गुजरात सीमेवरील महाराष्ट्रातील गावांना गुजरातमध्ये समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी सुरगाणा तालुक्यातील काही गावांनी गुजरात सरकारकडे केली आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सुविधा, बंधारे आदी सुविधांच्या अभावामुळे घेण्यात आलेल्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.6) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत बैठकीत संघर्ष समितीचे पदाधिकारी तसेच सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. दोन तास चाललेल्या बैठकीनंतर संघर्ष समितीचे अध्यक्ष चिंतामण गावित आणि पालकमंत्री दादा भुसे, आमदार नितीन पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पालकमंत्र्यांनी तालुक्याच्या प्रश्नावर कृती आराखडा तयार करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही गावित यांनी मात्र आपण विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याचे सांगत लवकरच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. येथूनच खर्‍या वादाला तोंड फुटले. इतकी सविस्तरपणे चर्चा होऊनही जर असा आडमुठेपणा दाखवला जात असेल तर हे बरोबर नाही, अशी नाराजी व्यक्त करत पालकमंत्री आक्रमक झाले.

- Advertisement -

स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांमध्ये झाले नाही ते ७५ दिवसांत किंवा ७५ तासांत झाले पाहिजे, असा आग्रह अनाठायी असल्याचे भुसे यांनी सांगितले. भुसे आक्रमक होताच गावितांसह शिष्टमंडळ नरमल्याचे दिसून आले. याच दरम्यान सीमावर्ती भागातील १२ गावातील सरपंचांनी गावितांसमोर पत्रकार परिषद सुरू असतांनाच आमचा गुजरातमध्ये विलीनीकरणास विरोध असून आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे आहे, अशी भूमिका जाहीर केली. सर्व सरपंचांच्या स्वाक्षरीचे निवेदनच भुसेंना दिल्याने गावित सर्वांसमोर एकाकी पडल्याचे दिसून आले.

पालकमंत्री भुसे आक्रमक

पालकमंत्री भुसे यांच्या बैठकीत प्रशासनाला आदेश देत स्थानिक स्तरावरचे प्रश्न आठवडाभरात मार्गी लागवण्याचे निर्देश दिले. तसेच इतर प्रश्नांवर राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही दिले. मात्र, तरीही चिंतामण गावित यांनी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका घेतली. अखेर दादा भुसे यांनी आक्रमक पवित्रा घेत गावित हे राष्ट्रवादीचे नेते असून थेट राष्ट्रवादीच्या लेटर हेडवरील मागण्यांचे निवेदन दाखवले.. त्यामुळे या आंदोलनाला राजकीय पार्श्वभूमी तर नाही असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे भुसेंच्या बाजूलाच बसलेल्या आमदार नितीन पवारांची चांगलीच कोंडी झाली. मात्र आपला या भूमिकेला विरोध असल्याचे त्यांनी जाहीर केले.

- Advertisement -
विलीनीकरणास यांचा विरोध

सीमावर्ती गावातील १२ गावांच्या सरपंचांनी गुजरातमध्ये विलीनीकरणास विरोध दर्शवला. याबाबतचे निवेदनही पालकमंत्रयांना देण्यात आले. यामध्ये अलंगुणचे सरपंच हिरामण गावित, गिरीश गायकवाड (उंबरठाण), संजाबाई खंबाईत (गोंर्दुणे), कमल भोये (रगतविहिर), रोहीणी वाघेरे (काठीपाडा), रेखा चौधरी (भवाडा), हरि चौरे (आंबाडा), शिवराम वळवी (खिर्डी), पांडूरंग गावित (कळमणे), यशवंत वाघमारे (कूकूमूडा), वैशाली गावित (बार्‍हे) यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -