विधिमंडळाचं अधिवेशन एक दिवसानं पुढे ढकलले, आता 3 आणि 4 जुलैला होणार अधिवेशन

महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या शपथविधीनंतर शिवसेनेने आपल्या 39 बंडखोरांपैकी 16 आमदारांच्या निलंबनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. एकनाथ शिंदे यांच्या निलंबनाची मागणीही शिवसेनेने याचिकेत केलीय

मुंबईः महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन एक दिवसानं पुढे ढकलण्यात आले असून, आता विशेष अधिवेशन 3-4 जुलै रोजी होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातही सरकारच्या कामकाजाला वेग आला आहे. आता 3 आणि 4 जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेय. या विशेष अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.

महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या शपथविधीनंतर शिवसेनेने आपल्या 39 बंडखोरांपैकी 16 आमदारांच्या निलंबनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. एकनाथ शिंदे यांच्या निलंबनाची मागणीही शिवसेनेने याचिकेत केलीय. त्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची शिवसेनेनं मागणी केली होती, परंतु ती मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन 3 जुलैपासून होणार असून, याच अधिवेशनादरम्यान विश्वासदर्शक ठरावही पारीत केला जाणार आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं होतं. ते अधिवेशन उद्यापासून म्हणजे 2 जुलैपासून सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण आता ते एक दिवसानं पुढे ढकलण्यात आलं आहे. दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपद रिकामे आहे. यासाठी आता लवकरच नियुक्ती केली जाणार असून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. कालच नवं सरकार स्थापन झालं आहे. या सरकारकडून लवकरच विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.


हेही वाचाः विधानसभा अध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटलांच्या नावाची चर्चा