घरमहाराष्ट्रजागा वाटपावरून सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली; नाशिकनंतर आता धाराशिवमध्येही दावे-प्रतिदावे

जागा वाटपावरून सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली; नाशिकनंतर आता धाराशिवमध्येही दावे-प्रतिदावे

Subscribe

धाराशीव : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रत्यके पक्ष मोर्चेबांधणीला लागला आहे. परंतु राज्याच्या सत्तेत असणारे भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागा वाटपावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. भाजपा आमदारांनी नाशिकनंतर आता धाराशिवमध्येही लोकसभा जागेवर आपला दावा सांगितल्यानंतर शिवसेनेनेही जोरदार उत्तर दिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून जागा वाटप, तयारी, दौरे, सभा यांची चाचपणी सुरू झाली आहे. नाशिकमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून लोकसभेच्या जागेवर दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले की, 2024 मध्ये धाराशिवमध्ये भाजपाचा खासदार व्हावा. आपल्या हक्काचं मोदी सरकार पुन्हा यावं. या अनुषंगाने सहकार्य करा, अशी विनंती केली होती. (There was a clash between the rulers over seat allocation; After Nashik, now in Dharashiv also claims-counter-claims)

- Advertisement -

जगजितसिंह यांच्या वक्तव्याविषयी तानाजी सावंत यांना विचारले असता ते म्हणाले की, ही जागा शिवसेनेची आहे. त्यांच्याकडून चुकून व्यक्तव्य करण्यात आले असावं. कारण, शिवसेना आणि भाजपाची युती आहे. लोकसभेला आम्ही 23 ठिकाणी लढताना 18 जागा निवडून आलो होतो. त्यामुळे आम्ही आमच्या 23 जागांवर ठाम आहोत. निवडून आलेली किंवा पराभव झालेली एकही जागा शिवसेना सोडणार नाही. धाराशिवची जागा ही शिवसेनाच लढणार आहे आणि कार्यकारिणी त्या जागेवर कोणता उमेदवार उभा राहिल हे ठरवेल. भाजपाकडून का दावा करण्यात आला माहिती नाही. तर ही जागा 25 वर्षापासून पारंपरिक पद्धतीने शिवसेनाच लढत आली आहे. त्यामुळे 2024 लाही ही जागा शिवसेनेचा लढवेल, अशी भूमिका तानाजी सावंत यांनी मांडली.

नाशिक लोकसभेच्या जागेवरही दावा
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी याआधी नाशिक लोकसभेच्या जागेवरही दावा केला होता. भाजपाच्या माजी नगरसेवकाने सोशल मीडियावर पोस्ट करत थेट लोकसभेच्या जागेवर दावा ठोकला आहे. त्यानंतर शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावरून संघर्ष सुरू असल्याचे बोलले जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरूनही भाजपा आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागा वाटपावरून कशारितीने तोडगा काढणार हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -