घरक्राइमआमदार यामिनी जाधवांच्या 'सापळ्या'त जेजेची अधिष्ठाता, शासनाकडून चौकशीचे आदेश

आमदार यामिनी जाधवांच्या ‘सापळ्या’त जेजेची अधिष्ठाता, शासनाकडून चौकशीचे आदेश

Subscribe

मुंबई : जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे पुन्हा एकदा विविध गैरव्यवहार प्रकरणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी विधानसभेत त्यांच्या या गैरव्यवहारांचा पाढाच वाचला. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन यावेळी राज्य सरकारकडून देण्यात आले.

आमदार यामिनी जाधव यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून डॉ. पल्लवी सापळे यांच्या विविध गैरव्यवहारांची प्रकरणे सभागृहात मांडली. या सर्व प्रकरणांचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा देखील त्यांनी केला. सध्या जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे या आधी मिरज येथे रक्तसंक्रमण शास्त्र विभागात कार्यरत होत्या. त्यावेळी डॉ. सापळे यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या डॉ. मिलिंद केसरखाने यांच्या मदतीने एका खासगी बँकेत खाते उघडले. तेथे संकलित रक्तामधील प्लाझ्मा वेगळा काढून त्याची विक्री करण्यात आली आणि त्यातून मिळालेले 13 लाख रुपये या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर याच पैशांतून एक अॅम्ब्युलन्स विकत घेऊन डॉ. सापळे यांनी आपल्या आईच्या नावाने ती हॉस्पिटलला दान केली, असा आरोप यामिनी जाधव यांनी केला.

- Advertisement -

जे. जे. रुग्णालयातील औषधे तसेच यंत्रसामग्री खरेदीत 5 ते 10 टक्के कमिशन घेतल्याशिवाय डॉ. सापळे बिले मंजूर करीत नाहीत, असे सांगतानाच, कोविड काळात अधिकारी म्हणून काम करणाऱ्या सनदी अधिकारी विनिता सिंघल यांनी शासनाला पत्र लिहून जे. जे. रुग्णालयात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची माहिती दिली. तसेच, डॉ. सापळे यांना त्वरित निलंबित करून या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची शिफारसही त्यांनी शासनाला केली होती, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली. शिवाय, डॉ. पल्लवी सापळे या एक गाडी भाड्याने वापरत असून त्याचे महिन्याचे बिल लाखाच्या घरात आहे. आतापर्यंत ही रक्कम 70 ते 80 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एवढ्या पैशांत शासन 10 गाड्या खरेदी करू शकते, असेही आमदार जाधव यांनी सांगितले.

यावर सरकारतर्फे राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी, आमदार यामिनी जाधव यांना या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -