घरCORONA UPDATEराज्यात पुढचे ४ दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार - हवामान विभाग

राज्यात पुढचे ४ दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार – हवामान विभाग

Subscribe

एकीकडे राज्यात कोरोनाच्या संकटामुळे आधीच संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचलेली जनता आता नव्या संकटासमोर उभी ठाकली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये १६ एप्रिल ते २० एप्रिल या ५ दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. यामुळे शहरी भागातल्या जनतेला थेट फटका बसणार नसला, तरी ग्रामीण भागातला शेतकरी वर्ग मात्र हवालदील होऊ शकतो. यामध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांना पुढचे पाचही दिवस तर दक्षिण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र या भागांना २० एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई हवामान विभागाचे संचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

१६ ते २० या कालावधीमध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसू शकतो. तर २० एप्रिल रोजी दक्षिण कोकणमधल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसोबतच अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आधीच मजूर मिळत नसल्यामुळे शेतातला माल बाजारपेठेपर्यंत पोहोचत नाहीये. त्यातच आता वादळी वाऱ्यासह पाऊस म्हटल्यावर शेतातला उभा माल पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमधल्या आंब्याला देखील या पावसाचा काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्ता कुठे पुणे-मुंबई आणि राज्याच्या इतर भागात पोहोचू लागलेला आंबा पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -